ओढणी एक, स्टायलिंग अनेक! दिवाळीमध्ये स्वतःला द्या असा हटके लुक

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज

कुर्ता असो वा सलवार-कमीज असो ओढणी परिधान केल्यानं पेहराव आणखी खुलून दिसतो. सध्याच्या ट्रेंडनुसार ओढणीला पारंपरिक पेहरावासोबतच फ्युजन आउटफिट्सना देखील मॅच केलं जातंय. या प्रकारची तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. ओढणीला वेस्टर्न आउटफिट्स भोवती गुंडाळून भन्नाट लुक तयार केले जातायत. अशा प्रकारच्या स्टायलिंगनं घरी असणाऱ्या ओढणीलासुद्धा नवा लुक (Fashion Tips) देऊ शकता.

जीन्सवर गुंडाळताना…
जीन्सला ओढणी विशिष्ट पद्धतीनं गुंडाळल्यानं आकर्षक लुक येतो. ओढणीसोबतच जीन्सभोवती पाचवारी किंवा नऊवारी साडी नेसून इंडो-वेस्टर्न फ्युजन केलं जातं. यात ओढणीला साडीप्रमाणे ड्रेप करण्याची फॅशन जास्त पाहायला मिळते.
– निऱ्या आणि पदराच्या मदतीनं फ्युजन करण्याचा ट्रेंड सध्या जोमात आहे. सध्या पदर गळ्याभोवती गुंडाळण्याची प्रचंड क्रेझ आहे.
– फ्युजनसाठी मेटॅलिक किंवा अन्य फॅशनेबल बेल्टचा वापर करा त्यानं भन्नाट लुक येईल.
– या प्रकारात प्लेन आणि गडद रंगाच्या जीन्सचा अधिक वापर केला जातो.
(Diwali 2020 खणाला मान, नथीची शान! महिलांना आकर्षित करतोय ‘हा’ लुक)
स्कर्टचा पर्याय
सणवारांसाठी काहीतरी हट के पेहराव करण्याचा विचार असेल तर स्कर्ट उत्तम पर्याय आहे. ऐनवेळी आणि अगदी कमी वेळेत होणारा पेहराव म्हणजे स्कर्ट अथवा लेहंग्याला ओढणी गुंडाळणं. दाक्षिणात्य पद्धतीचा पेहराव प्रत्येक तरुणीला भुरळ घालतो. तरुणींसोबतच महिलांमध्येही या प्रकाराची भरपूर क्रेझ आहे.
– लेहंग्याभोवती गुंडाळण्यासाठी जाळीदार, एम्ब्रॉयडरी आणि फिरता रंग असणाऱ्या ओढण्यांना जास्त मागणी असते.


पँट्सचे विविध प्रकार

सध्या पलाझो पँट आणि ब्लाउज टॉपसोबत ओढणीची स्टायलिंग करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. रंगसंगतीची योग्य जाण असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून या प्रकाराची ओळख आहे. सिगरेट पँटसोबत ओढणीचं गणित उत्तम जुळतं. स्टायलिश लुकसोबतच कम्फर्टेबल पेहराव म्हणून याकडे पाहिलं जातं.
– मेटॅलिक, शिमर, प्रिंटेड आणि वेलवेट पॅटर्नच्या पलाझो आणि सिगरेट पँट्समुळे आणखी उठावदार लुक मिळतो.
– पलाझो स्कर्टसारख्या भन्नाट पर्यायामुळे फ्युजन पेहराव करणं आणखी सोपं जातं.
(Diwali 2020 जुन्या कपड्यांना कसा द्यावा स्टायलिश टच, जाणून घ्या सेलिब्रिटी फॅशन डिझाइनरने दिलेल्या टिप्स)
होईल चर्चा
बॉटम वेअर्समध्ये बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी धोती पँटस आणि लेगिंग्स लक्ष वेधून घेत आहेत. यंदाच्या दिवाळीत काहीतरी भन्नाट पेहराव करण्याचा विचारात असाल तर लेगिंगवर ओढणी साडीसारखी गुंडाळू शकता.
– या पेहरावसाठी सीक्वीन पॅटर्नच्या लेगिंगची निवड करू शकता.
– साडी आणि लेगिंग्स यांचं फ्युजन करताना साडीचा रंग उठून दिसेल अशा कपड्यांची निवड करावी.
– बॉटम वेअर्ससाठी धोती पँट, लेगिंग्स, अफगाणी सलवार, पटियाला आणि पेटल पँट यासारखे उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
(Diwali 2020 चंदेरी साज! दिवाळीसाठी हटके लुक हवाय? जाणून घ्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेंड)
लेहंग्यासारखी साडी नेसा…!
साडीला लेहंग्याप्रमाणे नेसण्याची पद्धत फारशी नवीन नसली तरीही त्याचा ट्रेंड मात्र अजूनही कायम आहे. अत्यंत सोपा आणि हट के पर्याय अशी या पेहरवाची ओळख आहे. बनारसी सिल्कच्या घेरदार लेहंग्याना सध्या भरपूर मागणी आहे. यासोबतच बाजारात खास लेहंगा साडीसुद्धा मिळते. दोन ते तीन रंग असणारी लेहरीया साडी अतिशय सुंदर दिसते. लेहंगा साडीला अनेक प्रकारे नेसता येतं. साडीत वावरता न येणाऱ्या तरुणींसाठी लेहंगा साडी अत्यंत सोयीस्कर प्रकार आहे.

ब्लाउजची निवड करताना…
जीन्स, पलाझो किंवा लेहंग्यावर कोणत्या प्रकारचे ब्लाउज घालावेत हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. अशा वेळी स्टेटमेंट ब्लाउजचा पर्याय आहे. जर फ्युजन करायचा विचार असेल तर ब्लाउज टॉपची मदत घ्या. फेस्टिव्हल लुकसाठी भरजरी, शिमर अथवा सिक्वीन पॅटर्नचे ब्लाउज आणखी खुलून दिसतील. बॉटमवेअर्सना मॅचिंग ब्लाउजसुद्धा शोभून दिसतो. बाजारात ब्लाउजचे असंख्य पर्याय आहेत. शिवाय ऑनलाइन खरेदीही करू शकता. आवडीप्रमाणे शिवूनसुद्धा घेऊ शकता.

टिप्स
– स्टायलिंगचे असंख्य प्रकार असले तरीही तुम्हाला वावरण्यास सोपं जाईल असा प्रकार निवडा.
– रेडिमेड धोती साडी ऑनलाइनसुद्धा विकत घेऊ शकता.
– ओढणीप्रमाणेच जीन्सभोवती सिल्कच्या सुंदर काठ असणाऱ्या साड्यासुद्धा नेसू शकता. ओढणी आणि साडीची स्टायलिंग कशी करावी याचे युट्यूबवर अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत.
– पारंपरिक पद्धतीच्या पेहरावांना आणखी खुलवण्याचं काम कंबरपट्टा करतो. तुमच्या आवडीप्रमाणे अॅक्सेसरीजची निवड करू शकता.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *