कंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त आसन, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Spread the love


– प्रांजली फडणवीस
मागच्या भागामध्ये आपण आखडलेली कंबर मोकळी करण्यासाठी मर्कटासन (Markatasana) कसे उपयुक्त आहे, हे पाहिले. आता कमरेपाशी असणाऱ्या स्नायूंची थोडक्यात ओळख करून घेऊ. कमरेपाशी असलेला सगळ्यांत मोठा स्नायू आहे लॅटिसिमस डॉर्सी. या स्नायूची कल्पना करताना पक्ष्याच्या पंखाप्रमाणे करता येईल. हा स्नायू कमरेच्या मणक्यापासून सुरू होऊन पाठीवरून दंडापर्यंत पसरलेला आहे. जेव्हा आपण दोन्ही हात ताडासनात घेतो, तसे वर घेतो, त्या वेळेस तो ताणला जातो.

मर्कटासनामध्ये आपण दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला घेतो आणि खांदे स्थिर ठेवतो. अशा वेळेस लॅटिसिमस डॉर्सी या स्नायूचे दंडापाशी असलेले टोक स्थिर करून आपण कमरेचा भाग आणि पाय एका बाजूला वळवतो. त्यामुळे कमरेपाशी असलेला स्नायूचा भाग पिळला जातो. परिणामी, पाठीला पोक काढून किंवा कमरेतून सैल बसल्यामुळे कमरेच्या स्नायूंना आलेला स्टिफनेस कमी होऊन स्नायू मोकळे, लवचीक होतात.

()
कमरेच्या स्नायूव्यतिरिक्त पेल्व्हिसचा एक अतिशय महत्त्वाचा सांधा म्हणजे एसआय जॉइंट – सॅक्रो इलियाक जॉइंट, जो साधारण कमरेला मागच्या बाजूने दोन खड्डे असतात (ज्याला पेल्व्हिक डिंपल म्हणतात) त्या ठिकाणी येतो. या ठिकाणी दाबल्यानंतर बरेचदा वेदना होतात. एस आय जॉइंट मोकळा करण्यासाठी मर्कटासनाचा खूप चांगला उपयोग होतो. मर्कटासनाचा पुढचा प्रकार हा विशेषतः या भागासाठी उपयुक्त ठरतो.

()

कृती :
– पाठीवर उताणे झोपणे.
– हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून डोक्याखाली ठेवणे. दोन्ही हातांचे कोपर आणि खांदे जमिनीवर टेकवणे.
– डाव्या पायाचा अंगठा आणि त्याच्या बाजूचे बोट यामध्ये उजव्या पायाची टाच अडकवणे.
– दोन्ही पावले एकमेकांमध्ये अडकवून आता हळूहळू कमरेपासून दोन्ही पाय पूर्ण डाव्या बाजूला नेणे. उजव्या पायाची बोटे डावीकडे जमिनीवर टेकवणे.
– हात दोन्ही स्थिर आहेत. मान हळूहळू उजव्या बाजूला वळवणे.

()
– या स्थितीमध्ये ३० सेकंद थांबणे. या वेळात उजव्या पायाचा अंगठा खाली जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करणे. ही क्रिया करत असताना उजव्या बाजूची फक्त कंबर उचलली जाते आणि तेवढीच कंबर उचलणे, हे सोपे नाही.
मर्कटासनाचा हा दुसरा प्रकार एस आय जॉइंट आणि कमरेच्या स्नायूंसाठी खूप उपयुक्त आहे. दोन्ही बाजूने तीन वेळा हे मर्कटासन करावे. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी नियमित सकाळ-संध्याकाळ ही क्रिया करावी.

(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *