गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग

Spread the love

तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज

स्टायलिंग करताना गडद रंगासोबतच सौम्य रंगांनासुद्धा तितकंच महत्त्व द्यायला हवं. त्यापैकी एक म्हणजे गुलाबी रंग (Pink Color). गुलाबी रंगाच्या छटा सौंदर्य आणखी खुलवण्यात मदत करतात. सौम्य रंगाची आवड असणाऱ्यांना रोझ पिंक रंग आकर्षित करतो. हा रंग नवीन नसला तरीही या रंगाच्या अनेक वस्तू फॅशनप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आउटफिटपासून ते शूज, अ‍ॅक्सेसरीज, बॅग्स यामध्ये रोझ पिंक रंगाची सरशी पाहायला मिळतेय.

कपड्यांची क्रेझ
सध्याचा ट्रेंड पाहता तरुणींचा सौम्य छटा असणाऱ्या रंगांकडे कल जास्त आहे. पारंपरिक पोशाखापासून ते वेस्टर्न पेहरावांपर्यंत या रंगांना पसंती दिली जाते. विशेषतः डेनिम आणि वेलवेट कपड्यांमध्ये गुलाबी रंगाला भरपूर मागणी आहे. तरुणींसोबतच तरुणांच्या पेहरावामध्ये देखील रोझ पिंक रंगाची रेलचेल दिसत आहे.
– क्रॉप टॉप्स, जीन्स, जॅकेट, श्रग, वन पीस, पेन्सिल स्कर्ट, टी-शर्ट्स, शॉर्ट पँट्स, मिडी ड्रेस, पुलओव्हर टॉप्स, स्वेट शर्ट्स, सस्पेंडर्स

ट्रेंडी बॅग्स
पूर्वी बॅग खरेदी करताना गडद रंगांना पसंती दिली जायची. पण, सध्या गुलाबी रंगाच्या बॅग्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. स्लिंग बॅग्स, वेस्ट पाऊच, पैशांचं पाकीट यामध्ये डस्टी पिंक रंगाला विशेष मागणी आहे. खालील पॅटर्नमध्ये रोझ पिंक रंग अधिक खुलून दिसतात.
– मेटॅलिक, सिक्वीन, एम्ब्रॉयडरी, फर, खडे आणि मण्यांची डिझाइन
(सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी किंमत)
पारंपरिक पेहरावाची चलती

पारंपरिक पेहरावात सौम्य रंगाची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. सौम्य रंग परिधान केल्यानं व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसतं. नवरात्र, दिवाळी यासारख्या सणांना पारंपरिक पोशाखांना प्राधान्य दिलं जातं. पारंपरिक पेहरावांमध्ये सध्या पेस्टल रंगांची प्रचंड क्रेझ आहे. रोझ पिंक आणि सॅटीन कपड्याचं गणित उत्तम जुळतं. लेहेंग्यांमध्ये डस्टी पिंक, शिमर पिंक रंगाला विशेष मागणी आहे. अनारकली कुर्त्यांमध्ये देखील गुलाबी छटा लक्ष वेधून घेतात. सॅटीन व्यतिरिक्त शिफॉन, जॉर्जेट, जाळीदार कापड यांमध्येही रोझ पिंक रंग शोभून दिसतो.

नेलपेंटची चर्चा
नखं आकर्षक दिसण्यासाठी नेल आर्टची मदत घेतली जाते. नेल आर्ट करण्यासाठी रोझ पिंक, रोझ गोल्ड यासारख्या सौम्य आणि ट्रेंडी रंगांना पसंती देतात. नेल आर्ट येत नसणाऱ्या तरुणींसाठी बाजारात नेलं आर्ट टूल्स, स्टॅम्पिंग किट्स उपलब्ध असतात. गुलाबी रंगाची आवड असणाऱ्यांसाठी नेल पेंटमध्ये असंख्य छटा बाजारात मिळतात. शिवाय, गुलाबी रंगाचे खडे आणि मणी देखील सहजरित्या मिळतात. मेटॅलिक आणि मॅट फिनिश देणाऱ्या नेलपेंट्समुळे नखं अधिक सुंदर दिसतात.
(चमकते रहो! स्टायलिश लुक देणाऱ्या सिक्विन पॅटर्नची तरुणींना भुरळ)

सँडल्सना मागणी
चपलांमध्ये आणि शूजमध्ये गुलाबी रंग आधी तितकेसे पसंत केले जात नव्हते. पण, अलीकडच्या काळात नवनवीन डिझाइन आणि ट्रेंडमुळे रोझ पिंक रंगांना भरपूर मागणी आहे. तरुणींमध्ये लोफर्स आणि कॅनव्हास शूज स्नीकर्स तर महिलांमध्ये सँडल्स या प्रकारासाठी गुलाबी रंगाची निवड केली जाते. लहान मुलींसाठी देखील असंख्य डिझाइन्स बाजारात आणि ऑनलाइन उपलब्ध आहेत.
(जॅकेट्सचा स्टायलिश पर्याय, जाणून घ्या हे चार प्रकार)

अ‍ॅक्सेसरीज ठरतायत लक्षवेधी

अ‍ॅक्सेसरीजमध्ये रोझ गोल्ड रंगाला प्रचंड मागणी आहे. सोनेरी आणि चंदेरी रंगाला हट के पर्याय म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. शिवाय, मेटॅलिक रोझ गोल्ड रंगाच्या अनेक अ‍ॅक्सेसरीज ट्रेंडमध्ये आहेत. विशेषतः घड्याळांसाठी मेटॅलिक रोझ गोल्ड रंगाला अधिक पसंती मिळतेय. रोझ पिंक रंगाच्या खालील अ‍ॅक्सेसरीज तरुणींना आकर्षित करतात.
– ब्रेसलेट्स, नेकपीस, कानातले, बेल्ट, हेअरबँड, क्लच

टिप्स
० रोझ पिंक रंग सौम्य असल्यामुळे त्यांना उठावदार करण्यासाठी गडद किंवा मेटॅलिक रंगाचे क्लच किंवा चप्पल वापरावी.
० तुमच्याकडे रोझ पिंक रंगाची स्टेटमेंट ओढणी असायला हवी. या रंगाच्या ओढणीचं अनेक ड्रेसेस आणि कुर्त्यांसोबत स्टायलिंग होऊ शकतं.
० रोझ पिंक रंगाची आवड नसणाऱ्यांसाठी या रंगाच्या फ्लोरल प्रिंट्सच्या कपड्यांचा उत्तम पर्याय आहे.
० सफेद आणि गुलाबी रंगाचं गणित उत्तम जुळतं. गुलाबी रंगाच्या पँट्स किंवा पलाझो परिधान करताना सफेद रंगाच्या टॉपची मदत घ्या.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *