डेनिम है ना! नव्या आणि ट्रेंडिंग फॅशनची माहिती

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज
बदलत्या काळानुसार स्टायलिंगमध्येही भन्नाट बदल होताना पाहायला मिळतायत. पूर्वी डेनिम हा प्रकार केवळ पँट पुरताच मर्यादित होता. सध्या डेनिमची चलती असल्यानं अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. डंगरी, शूज, बॅग्स एवढंच नव्हे तर अॅक्सेसरीजमध्ये देखील डेनिमचा ट्रेंड पाहायला मिळतोय. शिवाय जुन्या जीन्सला देखील नवा लूक दिला जातोय. डेनिममध्ये होणारे नवनवीन प्रयोग आणि ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशनविषयी……

डेनिम पँट आणेल लूक

डेनिम आणि पँट हे समीकरण गेली अनेक वर्ष आपण पाहत आलो आहोत. पण, सध्या बाजारात डेनिमच्या पँटव्यतिरिक्त अनेक पँट्स पाहायला मिळत आहेत. तरुणींमध्ये हाय वेस्ट जीन्सची क्रेझ आहे. शिवाय, बूट कट, स्किनी, ट्राऊजर, फ्लेयर्ड, स्ट्रेट पँट यांचीही चलती आहे. पँटमध्ये डेनिम कुलॉट, रिब कुलॉट्सना पसंती मिळतेय. फ्रंट आणि बॅक सिम पॅटर्न असणाऱ्या डेनिम पँट्सदेखील फॅशनप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत.

मॅचिंग-मॅचिंग

आऊटफिटवर मॅचिंग किंवा परफेक्ट रंगसंगती असणारे शूज सर्वांनाच आवडतात. सध्या डेनिम शूजचा ट्रेंड आहे. डेनिम शूज नेहमीपेक्षा हट के लूक आणण्यासाठी मदत करतात. या पॅटर्नच्या शूजचे बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. कॅज्युअल शूजपासून ते स्निकर, ब्लॉक हिल्स, ऑफिस सँडल्स, ओपन टो सँडलपर्यंत सर्वांमध्ये डेनिमची सरशी पाहायला मिळत आहे. याशिवाय घरगुती वापरातील चपलांमध्ये डेनिमच्या कापडाचा वापर करुन आणखी आकर्षक बनवलं जातंय. लहान मुलांसाठी देखील कार्टून डिझाइन्स असणारे डेनिम शूज उपलब्ध आहेत.

डंगरी, स्कर्ट आणि बरंच काही!

तरुणींमध्ये डंगरी, मिडी, वन पीस ड्रेस यांची फॅशन कायमच पाहायला मिळते. पण, जर आणखीन उठावदार आणि हट के लूक आजमावून बघायचा असेल तर डेनिम ड्रेसचा उत्तम पर्याय आहे. बाजरात डेनिम ड्रेसचे बरेच पर्याय सहज उपलब्ध असतात. शिवाय, डेनिम ड्रेसची ऑनलाइन खरेदीही करू शकता. डेनिम कापडाचे टॉप आणि जॅकेट्सही मिळतात. ए-लाइन ड्रेस, जम्पसूट, मॅक्सी ड्रेस, कोल्ड किंवा ऑफ शोल्डर ड्रेस, डेनिम शर्ट ड्रेस परिधान करून वेगवेगळे लूक आजमावून बघू शकता. शिवाय, फ्रिल पॅटर्न असणारे डेनिम ड्रेस देखील ट्रेंडमध्ये आहेत. स्कर्टची आवड असणाऱ्या तरुणींसाठी मिडी स्कर्ट, डेनिम पेन्सिल स्कर्ट आणि डंगरी स्कर्टसारखे भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत.

स्टायलिश अॅक्सेसरीज

स्टायलिंग करताना आऊटफिटसोबतच अॅक्सेसरीजवर देखील समान लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं स्टायलिस्ट आवर्जून सांगतात. लूकला चार चांद लावण्यासाठी अॅक्सेसरीजची भूमिका महत्त्वाची ठरते. नेकपीसमध्ये चोकर हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. सध्या डेनिम चोकरला भरपूर मागणी आहे. ऑफ शोल्डर तसंच ट्यूब टॉपवर डेनिम चोकर घातल्यानं पार्टीवेअर लूक येतो. डेनिम हेअरबँडना देखील मागणी असते. डेनिम कापडाचे कानातले इंडो-वेस्टर्न आऊटफिटवर शोभून दिसतात. विविध रंगाचे डेनिम उपलब्ध असल्यानं स्टायलिंगमध्ये त्याचा जास्त वापर केला जातोय. लहान मुलींकरिता रंगबेरंगी डिझाइन्स असणारे डेनिम क्लिप्स बाजारात उपलब्ध आहेत.

बेल्ट करेल सेट

कंबरेच्या पट्ट्यामध्ये कायम नवनवीन फॅशन पाहायला मिळते. याचं उत्तम उदाहरण डेनिमचा पट्टा. डेनिम बेल्टच्या साहाय्यानं बऱ्याच प्रकारच्या फॅशन करता येऊ शकतात. युट्यूबवर डेनिम बेल्ट स्टायलिंगचे असंख्य व्हिडीओज आहेत. डेनिम सस्पेंडर या प्रकाराची चलती आहे. बेल्टनं साधारण टॉपला आकर्षक लूक देऊ शकता. पट्टा या प्रकारात आणखी एक भन्नाट फॅशन म्हणजे वॉच बेल्ट. डेनिम वॉच बेल्ट तुमच्या लूकला आणखी क्लासिक बनवायला मदत करेल. विशेषतः तरुणांमध्ये अशा पट्ट्याची जास्त क्रेझ पाहायला मिळते.

बॅग्स दिसतील हट के

टिकाऊ आणि मजबूत अशी डेनिमची ओळख आहे. यामुळेच कॉलेज बॅग्स तयार करण्यासाठीही डेनिमचा उपयोग केला जातो. कॉलेजिअन्समध्ये डेनिम बॅग्सची प्रचंड क्रेझ आहे. डेनिम बॅग मनाप्रमाणे शिवूनही घेतल्या जातात. शोल्डर बॅग, स्लिंग बॅग्स यासोबतच डेनिम क्लच आणि वन साइड पर्सना महिला पसंत करतात. बॅग्स सोबतच वॉलपीस, पाऊच, टोपीमध्ये देखील डेनिमला पसंत केलं जातं. खराब झालेल्या पँटपासून बास्केट देखील बनवू शकतो. डेनिम बॅक कव्हर देखील लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

उत्तम पर्याय
जुन्या डेनिम कपड्यांना नवीन लूक देण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नसते. डेनिमचा उपयोग वॉल आर्ट करण्यासाठीसुद्धा होतो. पैशाचं पाकीट, कानातले, नेकपीस, डायरी कव्हर, मास्क यांसारख्या छोट्या वस्तू घरी सहज तयार करता येतात. यासाठी युट्यूबचीही मदत घेऊ शकता. शिवाय, डेनिम जॅकेटवर घरच्या घरी एम्ब्रॉयडरीही करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे डेनिमवर पॅचवर्क अथवा भरतकाम करून काहीतरी वेगळं ट्राय करू शकता. सध्या घरी असल्यामुळे वेळ आणि जुने कपडे दोघांचाही योग्य वापर करायचा असल्यास हा पर्याय उत्तम आहे.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *