तोडा वेदनेची शृंखला! व्याधींना दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय

Spread the love

– प्रांजली फडणवीस

आतापर्यंत या सदरात आपण ऑफिसमध्ये, कामाच्या दरम्यान, उपलब्ध जागेत, खुर्चीवर बसून कुठले व्यायाम प्रकार करता येतात, हे पाहिले आणि पुढेही पाहणार आहोतच. कामाच्या पद्धतींमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर गेल्या काही वर्षांपासून मी ‘पोश्चरल करेक्शन योगथेरपी’ देत आहे. त्या अनुभवातून काही निष्कर्ष जाणवतात, ते आपल्यासमोर मांडते.

– व्याधी कधीही अचानक उद्भवत नाही. आपले शरीर आपल्याला आंतरिक अस्वस्थतेची जाणीव करून देत असते.

– जाणिवेचा पहिला भाग म्हणजे टेंडरनेस (घट्टपणा) : आपण दररोज स्नान करतो. त्या वेळी मानेपाशी, खांद्यापाशी, कमरेपाशी, दंडाच्या मागे, गुडघ्याच्या मागे, पोटरी, तळपाय आदी ठिकाणी स्नायू कडक झाले आहेत का हे जरूर पाहावे.
(तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेताय? श्वासोच्छवासाचे सोपे ६ व्यायाम प्रकार)

– योग्य विश्रांती :
थकलेल्या स्नायूंना तरतरी आणायची असेल, तर त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे. स्नायू ज्या हाडांच्या साह्याने हालचाल करतात, तो सांधा नैसर्गिक स्थितीत राहिला, तर स्नायूंना विश्रांती मिळते. जसे, मानेखाली चादरीचा रोल घेतला, तर मान, खांद्याचे स्नायू विसावतात. ‘फ्रोजन शोल्डर’मध्ये खांद्याखाली पातळ घडी घेतल्यास खांद्याचे स्नायू विसावतात.

– योग्य आहार : आहारामध्ये स्नायूंना आवश्यक असलेले घटक कमी पडले, तर स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. स्नायूंमधील झीज लवकर भरून निघत नाही. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा.

– भरपूर पाणी प्यावे : पाणी हे ‘नॅचरल डिटॉक्स’ आहे. शरीरातील ‘टॉक्सिन्स’ पाण्याद्वारे कमी होऊन स्नायूंची कार्यक्षमता वाढते.

– शरीराची जाणीव : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचे आपण नियोजन करतो; पण ज्या शरीराच्या आधारे आपण हे करतो, त्या शरीराला आपण गृहीत धरतो. स्वास्थ्य संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कुठलीच कृती आपल्याकडून नियमितपणे होत नाही.
(Health Care नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात)

– सांधे स्नायूंकडे दुर्लक्ष (मान मोडेपर्यंत काम), हेळसांड (टेंडरनेस), असंतुलित स्नायू (लचकणे/उसण भरणे), वेदना म्हणून पेन किलर, दररोज सांधे दुखल्याने एक्स-रे, परिणामी, पोश्चरमध्ये बदल, सांध्यात अजून झीज, पुन्हा असह्य वेदना, मग शस्त्रक्रिया आणि ते झाल्यावरही पुन्हा स्नायूंची देखभाल न केल्याने परत वेदना, असे चक्र होऊन बसते. स्नायूंची देखभाल न करणे हे वेदनेचे मुख्य कारण होऊ शकते. त्यामुळे स्वास्थ्य संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी शरीराची जाणीव हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘व्यायामाचा योग’ या लेखमालेतील सर्व लेख हे आपल्या शरीराप्रति जाणीव वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी मला खात्री आहे.
(Health Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे)
आपल्या कामामुळे जे ‘पोश्चर’ शरीराकडून जास्तीत जास्त काळ घेतले जाते, त्याचा अभ्यास करा. आपण रोज किती काळ उभे असतो, बसलेले असतो, मानेची, हातांची आणि पायांची किती प्रमाणात हालचाल होते, पाठीचा कणा किती काळ एका स्थितीमध्ये असतो, शरीराची उजवी बाजू व डावी बाजू सम प्रमाणात काम करते का, थकलेल्या सांधे आणि स्नायूंना दिवसातून आपण किती वेळ विश्रांती देतो, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते का, या प्रश्नांची उत्तरे शोधा. त्यामुळे शरीराच्या कुठल्या भागाला विश्रांतीची आणि कुठल्या भागाला व्यायामाची गरज आहे, याबाबत आकलन होईल. कामाच्या व्यापात शरीराच्या त्या भागावर किती ताण येत आहे आणि वेदना होऊ नये म्हणून शरीराने कसे ‘पोश्चर’ स्वीकारले आहे, हे समजेल. ज्या क्षणी हे कळेल, त्या क्षणापासून वेदनेची शृंखला तुटण्यास मदत होईल.
(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *