धूम्रपानाची सवय आहे? जाणून घ्या रक्तवाहिन्यांशी संबंधित होणारे विकार : तज्ज्ञांची माहिती

Spread the love

डॉ. वैभव लेंडे, रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूर

आज धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन, जीवनशैलीचा एक भाग बनू पाहत आहे. स्टाइल स्टेटमेंट म्हणून धूम्रपान करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. युवावर्गात तर धूम्रपानाची क्रेज दिसून येते. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मुख कर्करोगापासून ते फुप्फुसांच्या कर्करोगापर्यंत सगळ्या कर्करोगांना कारणीभूत ठरते. अर्थात याबद्दल जागृती नाही, असे देखील नव्हे. मात्र, याशिवाय धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवरही (Health Care) मोठा प्रभाव पडतो व रक्तवाहिन्यांचे विकार जडतात. धुम्रपानाच्या माध्यमातून चार हजारांहून अधिक घातक रसायने शरीरात प्रवेश करतात हे वैज्ञानिक प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. त्यापैकी निकोटिन व कार्बन मोनोक्साईड सर्वात घातक असतो.

१. रक्तवाहिन्यांना येणारी सूज : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर सूज येते. त्या जाड होऊ लागतात. धूम्रपानाचे व्यसन दीर्घकालापर्यंत असेल तर सूज दिवसेंदिवस अधिकाधिक वाढते. त्यामुळे रक्तवहनास अडथळा निर्माण होतो.

२. रक्त गोठणे : धूम्रपानामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. रक्त गोठल्याने अशुद्ध रक्तवाहिन्यांत डीव्हीटीसारखे विकार जडतात. रक्त गोठल्यामुळे हात व पाय देखील गमवावा लागू शकतो.
(शुद्ध व भेसळयुक्त तुपातील फरक कसा ओळखावा? जाणून घ्या या ५ सोप्या पद्धती)
३. कोलेस्ट्रॉलच्या स्तरात वाढ :रक्तामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल (हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल) व वाईट कोलेस्ट्रॉल (लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल) असतात. धूम्रपानामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होऊन वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे हृदयासह हात व पायाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व रक्तप्रवाह खंडित होतो. अशा वेळी हातापायात वेदना सुरू होतात.

४. उच्चरक्तदाब : धूम्रपानामुळे उच्चरक्तदाबाचा त्रास सुरू होतो. जे पूर्वीपासूनच उच्चरक्तदाबाने ग्रसित असतील, त्यांना तो नियंत्रित करण्यात त्रास होतो. युवावस्थेपासून धुम्रपानाचे व्यसन असणाऱ्यांना चाळीशीत उच्चरक्तदाबाचा त्रास सुरू होतो. थोडं काम केल्याने थकवा जाणवतो. शिवाय पायापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पायांवरही प्रभाव पडतो.

लक्षणे
पाय दुखणे, पायात जळजळ, थोडं चालल्यावर पोटऱ्या दुखणे, रात्री पाय दुखणे, जखम झाली की भरून न येणे ही साधारणपणे धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांवर झालेल्या परिणामांमुळे उद्भवलेली लक्षणे आहेत. कधी शुद्ध्र रक्तवाहिन्यांत गाठ होऊन पाय थंड पडू शकतो. त्यास वैद्यकीय भाषेत ‘अॅक्युट लिंब इश्कमिया’ म्हणतात. ही वैद्यकीय आणिबाणी असते. सहा तासात उपचार मिळाला नाही, तर पाय देखील कापावा लागू शकतो.
(व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती)
उपचार
धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे तातडीने सेवन थांबविल्यास चाळीस टक्के उपचार तसाच होतो. रक्तवाहिन्यांचे तज्ज्ञ अ‍ॅन्जियोग्रामद्वारे कुठली रक्तवाहिनी बंद पडली याची तपासणी करतात. त्यानंतर अ‍ॅन्जिओप्लास्टी, स्टेंटिंग किंवा बायपास सर्जरीद्वारे उपचार केला जातो. त्यामुळे पायाचा अल्सर भरून निघण्यास मदत होते. डीव्हीटीसारखे विकार झाल्यास रक्त पातळ करण्याची औषधे दिली जातात. लक्षणे आढळल्यावर तातडीने रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे.
(सायकलिंगला सुरुवात करताय? मग आरोग्यासाठी या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक)
योग्य वेळेत उपचाराचे महत्त्व
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते, याबद्दल समाजात जागृती नाही. हे विकार मुख्यत्वेकरून तरुणांना होतात. त्यामुळे तरुण वर्ग आम्हाला असं काही होऊच शकत नाही, याबद्दल ठाम असतात. धुम्रपानाची सवयही तशीच राहते…! मग रक्तवाहिन्यांचा विकार विक्राळ रुप घेतो. त्यामुळे तुम्ही धूम्रपान करीत असाल व तुम्हाला वर सांगितलेली लक्षणे आढळून आली तर तुम्ही तातडीने रक्तवाहिनी शल्यचिकित्सकांचा (व्हॅस्कुलर सर्जन) सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *