मानसिक ताण कमी करायचाय? तज्ज्ञांच्या मते हे काम केल्यास आरोग्याला मिळतील भरपूर फायदे

Spread the love

मुंबई टाइम्स टीम
लॉकडाउन दरम्यान हाती असलेला वेळ बऱ्याच लोकांनी बागकामासाठी दिला. लॉकडाउनमध्ये इतर कामांसोबतच बागकाम केलेल्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं. आरोग्याच्यादृष्टीनं बागकामाचे फायदे झाल्याचं ते सांगतात. बागकाम मानसिक तणाव कमी करण्यासही मदत करतं. यासोबतच स्वतः फुलवेल्या बागेत लोक भावनिकरीत्याही गुंतात असं तज्ज्ञ सांगतात.

सकारात्मकतेचा स्रोत
लॉकडाउनमुळे गेले काही महिने कठीण काळाला सामोरं जावं लागलं. यादरम्यान अनेकांना तणावाचा सामना करावा लागला. बागकाम केवळ क्रिया नसून कित्येक आजारांवर उपचार देखील आहे. एन्झायटी, एकटेपणा, मनोविकार, लहान मुलांचे मानसिक विकार यांच्यावर मात करण्यासाठी नेचर थेरपी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक अभ्यासकांनी निसर्गाचं महत्त्व पटवून दिलंय. निसर्गाशी आपली नाळ जोडली गेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यानं अनेक गोष्टींवर मात करता येते, असं तज्ज्ञ सांगतात. बागकामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय, अनेक शारीरिक आणि मानसिक विकार बरे होऊ शकतात. झाडांच्या सान्निध्यात राहिल्यानं मनःशांती मिळते.

सध्याच्या कठीण काळात सकारात्मक राहण्यासाठी झाडं प्रेरणा देतात असं तज्ज्ञ सांगतात. निसर्गाच्या सभोवताली राहण्याचे अनेक फायदे आहेत. झाडं मोठ्या प्रमाणात प्राणवायू पुरवतात. ऑक्सिजनच्या पातळीमुळे संप्रेरकांचा स्राव योग्य राहण्यास मदत मिळते. मातीकाम केल्यानं शरीरातील सेरोटोनिनचं (मानवी स्वभावाशी संबंधित असणारं संप्रेरक) प्रमाण नियंत्रित राहतं. माती आणि फुलांच्या सुंगंधामुळे मूड देखील फ्रेश राहतो. यामुळेच अनेक अभ्यासक बागेत अथवा गवत असणाऱ्या जागी अनवाणी फिरण्याचा किंबहुना झाडांना मिठी मारण्याचा सल्ला देतात.
(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)

नेचर थेरपीचं महत्त्व

गेल्या काही दिवसात बऱ्याच नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं. लॉकडाउनसारख्या कठीण काळात बागकाम केल्यानं भरपूर ऊर्जा मिळाल्याचं अनेक जण सांगतात. बागकाम केल्यानं संयम वाढला असंही ते आवर्जून सांगतात. प्रत्येक वेळी आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्लॅनिंगच करावं लागतं असा काही नियम नाही हे मला लॉकडाउननं शिकवलं, असं अनेकजण नमूद करतात. वनस्पतींच्या सान्निध्यात राहिल्यानं स्वतःमध्ये खूप बदल झाल्याचंही काही जण सांगतात. अन्नाची अॅलर्जी, संधिवात आणि तत्सम शारीरिक समस्या असणाऱ्या व्यक्तींनाही नेचर थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो. ही थेरपी घेतल्यानंतर अगदी कमी वेळात प्रकृती सुधारल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. ही थेरपी घेतलेल्या लोकांनी नैराश्य, चिडचिड, मानसिक आजार यावर मात केल्याचं निदर्शनास आलंय.
(Health Care शरीर फिट ठेवण्यासाठी करा या ७ महत्त्वाच्या गोष्टी)

ऊर्जा मिळेल
निसर्गाच्या सहवासात राहणं हा देखील एक प्रकारचा उपचारच आहे. निसर्ग नकळतपणे आपल्याला खूप काही शिकवत असतो. प्रत्येक वेळी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं शक्य नसणाऱ्यांना घरात बाग फुलवण्याचा पर्याय आहे. बागकाम केल्यानं श्वसनक्रिया सुधारते, रक्तदाब आणि बरेच आजार आटोक्यात राहण्यास मदत मिळते. शिवाय बागकाम केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि एकाकीपणाही दूर होऊ शकतो, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

लॉकडाउनमध्ये घरात बाग फुलवलेले अनेक जण सांगतात की, बागकाम एखाद्या थेरपीप्रमाणेच काम करतं. पेरलेल्या बियांपासून अंकुर आणि रोप तयार होईपर्यंत सर्व गोष्टी जवळून पाहता येतात. या प्रक्रियेतून खूप गोष्टी शिकायला मिळतात. शिवाय, अडचणींना सामोरं जाण्याचं बळही मिळतं. तर तज्ज्ञ सांगतात की, निसर्गाला कमी न लेखता आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वागवा. निसर्ग भरभरुन देत असतो. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.
(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)
संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *