रक्तप्रवाह सुरुळीत राहण्यासाठी व पोटरीचे स्नायू हलके होण्यासाठी नियमित करा ‘हे’ साधेसोपे व्यायाम!

Spread the love

प्रांजली फडणवीस

कुठलाही अवयव सुदृढ राहण्यासाठी किंवा व्याधी निर्मितीसाठी रक्तसंचलन हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. संचलन म्हणजे आवागमन. योग्य प्रमाणामध्ये रक्त अवयवाच्या आत येणे आणि योग्य प्रमाणामध्ये रक्त अवयवाच्या बाहेर जाणे, यालाच रक्त संचलन किंवा रक्ताचे आवागमन म्हणतात. कुठल्याही अवयवांमध्ये शुद्ध (ऑक्सिजनयुक्त) रक्त आणि अशुद्ध (ऑक्सिजनविरहित) रक्त, रक्तवाहिन्या आणि केशवाहिन्या असतात. अशुद्ध रक्त म्हणजेच वापरलेले रक्त हे ऑक्सिजनविरहित आणि पोषकमूल्यविरहित असते. हे रक्त जोपर्यंत अवयवातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत नवीन शुद्ध रक्त त्या अवयवांमध्ये प्रवेश करणार नाही. (अनेकदा कमी हालचालींमध्ये रक्ताचे आवागमन होते; परंतु कमी प्रमाणामध्ये). रक्ताचे हे आवागमन होण्यासाठी स्नायू आणि सांध्यांची हालचाल होणे गरजेचे आहे. जेवढे स्नायू आणि सांधे त्यांच्या पूर्ण क्षमतेने आकुंचित आणि प्रसारित होतील, तेवढ्या त्या भागातील रक्तवाहिन्या आणि केशवाहिन्या आकुंचित आणि प्रसारित होतील. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर निर्माण होते, ज्याद्वारे रक्त अवयवाच्या आत आणि अवयवातून बाहेर जाते.

(वाचा :- डायबिटीजवर रामबाण उपाय आहेत मेथीदाणे, जाणून घेऊया वापराची पद्धत!)

गुडघ्याच्या आरोग्यासाठी जसा आपण गुडघ्याच्या आणि मांडीच्या स्नायूंचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे पायाच्या पोटऱ्यांचासुद्धा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. शरीर अवयवांमध्ये हाताचे कार्य, पाठीचे कार्य, पायाचे कार्य हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. जसे हाताचे कार्य वजन उचलणे आहे, त्यासाठी खांद्याचे स्नायू बलवान असतात, त्याचप्रमाणे बोटांद्वारे कौशल्यपूर्ण काम करण्यासाठी तेवढेच तरबेज स्नायू तळहातात असतात; तसेच पायाचे स्नायू चालण्यासाठी आणि धावण्यासाठी उपयुक्त आहेत. पायाचे कामच मुळात चालण्यासाठी आहे; परंतु आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे सतत हालचाल अपेक्षित असलेले पायाचे स्नायू खूप काळ एका स्थितीमध्ये स्थिर राहतात. पोटरीचे स्नायू जेवढे आकुंचित आणि प्रसारित होतील, तेवढे पायाकडून अशुद्ध रक्त पंप करून हृदयापर्यंत पोहोचवले जाते. अशा वेळी पोटरीचे स्नायू एका स्थितीमध्ये स्थिर राहिल्याने तिथे हालचाल घडत नाही आणि अशुद्ध रक्त योग्य पद्धतीने हृदयाकडे संचलित केले जात नाही. खुर्चीवर बसल्यानंतरसुद्धा आपला चवडा जमिनीवर टेकलेला असतो आणि टाच वर उचललेली असते. अनेक तास आपण या स्थितीत बसतो. महिलांमध्ये हाय हिल्स वापरल्यामुळे पोटरीचे स्नायू घट्ट आकुंचित होतात. खूप वेळ उभे राहून काम करणाऱ्या लोकांचे संध्याकाळनंतर पाय भरून येतात. या सर्वांसाठी पोटरीचे स्नायू मोकळे असले पाहिजेत, त्यांच्यात आकुंचन आणि प्रसारण हे दोन्ही चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. अशुद्ध रक्त पोटरीपासून, गुडघ्यापासून हृदयाकडे गेले नाही, तर त्या भागांमध्ये वापरलेले रक्त साठून राहते आणि अशा रक्तामध्ये असलेली अशुद्धता, दूषित विजातीय साठल्यामुळे त्या भागांत सूज येते किंवा वेदना होतात. या भागात आपण गुडघ्याचा सांधा मोकळा होण्यासाठी पोटरीची हालचाल पाहणार आहोत.

(वाचा :- आयुर्वेदिक पद्धतीने मिळवा मानसिक तणाव व नैराश्यातून मुक्ती, तन-मन होईल शांत!)

प्रकार १ : योगासनांमध्ये ताडासन हे मूलभूत आसन आहे, ज्याद्वारे टाचा वर उचलून पोटरीचे स्नायू घट्ट केले जातात. ज्या व्यक्तींना ताडासन जमत नाही, अशा व्यक्तींनी भिंतीला टेकून सरळ ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करावा. साधारण दहा सेकंदांपासून एक मिनिटापर्यंत या स्थितीत थांबल्यास चांगला फायदा होतो.

(वाचा :- अथक प्रयत्नांनंतरही लठ्ठपणा कमी होत नसल्यास डिनरवेळी करा ‘ही’ ५ कामे!)

प्रकार २ : – पायरीपाशी उभे राहून फक्त चवडा पायरीवर टेकवणे. – हाताच्या आधाराने सरळ उभे राहणे. – हळूहळू पोटरीच्या स्नायूंना सहन होईल, एवढ्या प्रमाणात टाच सावकाश खाली नेणे. या स्थितीत पाच आकडे थांबणे. – सावकाश टाच वर उचलून ताडासनाप्रमाणे थांबणे. या स्थितीत पाच आकडे मोजणे. हा प्रकार १० ते २० वेळा जरूर करावा. व्हेरिकोज व्हेन्स असणाऱ्या व्यक्तींना हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे.

(वाचा :- सायलेंट किलर असतो हाय बीपी! अशी ओळखा हाय बीपीची सुरुवातीची लक्षणे)

प्रकार ३ : काफ स्ट्रेच – भिंतीजवळ उभे राहून दोन्ही हातांनी भिंतीचा आधार घेणे. – डाव्या पायाचा चवडा भिंतीवर टेकवून टाच खाली जमिनीवर टेकवणे. – कमरेपासून सरळ ताठ उभे राहणे. – दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करणे. – हळूहळू मागच्या पायाची टाच वर उचलून कमरेपासून शरीर भिंतीच्या दिशेने जवळ नेणे. – या स्थितीत दहा आकडे थांबणे. असेच दुसऱ्या पायांनी करणे. – तीनदा डाव्या आणि तीनदा उजव्या पायाने ही क्रिया करणे. हे तिन्ही प्रकार एकत्र करावेत. पहिल्या प्रकारामध्ये पोटरीचे स्नायू आकुंचित झाले होते, दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांच्यात हालचाल होऊन ते मोकळे झाले आणि तिसऱ्या प्रकारात त्यांना ताण देऊन आपण त्यामध्ये असलेल्या सगळ्या रक्‍तवाहिन्या मोकळ्या केल्या.

(वाचा :- सुदृढ व सडपातळ शरीरासाठी घरबसल्या करा ‘हे’ साधेसोपे व्यायाम!)

(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.) —


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *