Diwali 2020 टिशू साडीमुळे खुलेल सौंदर्य, जाणून घ्या फॅशन ट्रेंड

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज
आजकाल टिशू साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. त्याला ऑर्गांझा साडी असंही म्हणतात. टिशू साडी दिसायला अगदी जाळीदार असली तरीही कापडात वेगळेपणा जाणवतो. टिशू साडी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पाहायला मिळते. ही साडी नेसल्यानंतर वावरणं सोपं असतं. त्यामुळे सुती, मलमल, शिफॉन, सॅटीन यासारख्या मऊ साड्यांच्या यादीत टिशू साडीला देखील स्थान मिळालंय.

प्रिंट आणेल लुक
टिशू साडी नाजूक असल्यामुळे त्यावर डिझाइन किंवा प्रिंटसुद्धा नाजूकच असते. सध्या फ्लोरल प्रिंटची चलती आहे. टिशू साड्यांवर फुलाफुलांची प्रिंट खूप सुंदर दिसते. प्लेन टिशू साडी पण तितकीच आकर्षक असते. या प्रकारच्या साड्या नाजूक असल्यामुळे जास्त भरजरी विणकाम केलं जात नाही. टिशू साड्यांची किंमत खिशाला परवडणारी असते. साध्या कार्यक्रमांपासून ते सणसमारंभांना नेसण्यासाठीसुद्धा टिशू साडीला पसंती दिली जातेय.

चमकणाऱ्या साडीला मागणी
भारतीय पेहरावात चमक असणाऱ्या कपड्यांना पसंत केलं जातं. टिशू साडीत शिमर पॅटर्नची प्रचंड चर्चा आहे. शिमर साड्या सौंदर्यात कमालीची भर घालतात. त्यात सिल्क आणि जरीच्या धाग्यांनी तयार केलेली साडी अत्यंत मऊ आणि हलकी असते. त्यामुळे यात शिमर पॅटर्न खूप सुंदर दिसतं. चंदेरी, सोनेरी तसंच टू टोन पॅटर्नमुळे आणखीन उठावदार लुक मिळण्यासाठी मदत होते. पारंपरिक साड्यांचा विचार केला तर आपल्याकडे टिशू पैठणीला भरपूर मागणी आहे. बनारसी सिल्क, पट्टू साडी, कांजीवरम यासारख्या उंची साड्यांमध्येही टिशू या प्रकाराची चलती आहे.
(Diwali 2020 खणाला मान, नथीची शान! महिलांना आकर्षित करतोय ‘हा’ लुक)

ब्लाउजचे अनेक पर्याय
टिशू साड्यांना उठावदार दिसण्यासाठी ब्लाउजची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. टिशू साड्यांमध्ये हलके रंग जास्त पाहायला मिळतात. टिशू साडीवर ब्लाउज कोणता घालावा हा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. टिशू साडीची कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाउजसोबत उत्तम जोडी जुळते. तुमच्याकडे जर मल्टी कलर साडी असेल तर त्यातील सर्वात कमी रंग असतो त्या रंगाचे कापड विकत घ्या. ब्लाउजसाठी पॉली सिल्क, सॅटीन, टफेटा सिल्क, शिमर अथवा टेक्श्चर असणारे कापड निवडावेत. साडी जर प्लेन असेल तर टू टोन, जरीकाम किंवा प्रिंटेड ब्लाउज शोभून दिसतात. फेस्टिव्हल लुकसाठी ब्रोकेड कापडाचे ब्लाउज सुंदर दिसतात. भरजरी डिझाइन असणारे ब्लाउजसुद्धा सौंदर्यात भर घालतील.
(ओढणी एक, स्टायलिंग अनेक! दिवाळीमध्ये स्वतःला द्या असा हटके लुक)

काळजी घेणं आवश्यक

साडी वर्षानुवर्षे टिकावी यासाठी ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. टिशू किंवा सिल्क कापड हे खूप मऊ आणि नाजूक असतं. त्यामुळे टिशू साड्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. टिशू साडीची घडी नियमित बदलत रहा. टिशू, नेट आणि ऑर्गांझा साड्यांना ड्राय क्लिनिंगची गरज असते. अशा साड्यांवर बॉडी स्प्रे किंवा परफ्युम लावणं टाळा. धातूच्या हँगरला साडी अडकवल्यानं साडीला गंजाचे डाग लागण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे हँगरला अन्य पर्याय निवडा.
(Diwali 2020 यंदा इंडोवेस्टर्न हिट! जाणून घ्या फॅशनमधील नवीन ट्रेंड)

टीप्स

– प्रत्येक तरुणी किंवा महिलेची साड्यांबाबतीत स्वतंत्र आवड असते. तुम्हाला कमी वजनाच्या आणि सॉफ्ट साड्या आवडत असतील तर टिशू साडीचा पर्याय निवडा.
– या साडीवर स्लीवलेस किंवा कोपरापर्यंतच्या हाताचे ब्लाउज घालण्याला पसंती दिली जाते.
– टिशू किंवा ओर्गांझा टिशू साडी विकत घेण्याआधी त्या हलक्या ट्रान्सपरंट असतात हे ध्यानात असू द्या.
– टिशू साडीच्या आत नेहमी सॅटिन किंवा त्याच शेडच्या शिमर फॅब्रिकचा पेटीकोट घालावा. त्यामुळे साडीला अधिक चांगला लुक येतो.
– फ्लोरल प्रिंट आवडत नसेल तर मल्टी कलर प्रिंटचा भन्नाट पर्याय आहे.
– टिशू साडी आणखी खुलून दिसण्यासाठी नाजूक कानातलं आणि नेकपिस घाला.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *