Diwali 2020 Recipe मटरी, मालपुवा आणि मुरुक्कू

Spread the love

श्रुती केतकर
भारतात दिवाळी सर्वत्र साजरी केली जाते. दिवाळीमध्ये घराघरांत पणत्या लावल्या जातात, घराबाहेर आकाशकंदील लावून रोषणाई केली जाते, रांगोळी काढली जाते. खास महाराष्ट्रामध्ये किल्ला केला जातो. भरपूर फराळही दिमतीला असतो. पाहुण्यांना आमंत्रित केलं जातं. वसुबारस, धनोत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे दिवस साजरे करून दिवाळीचा आनंद लुटला जातो. जिल्ह्यानुसार, राज्यानुसार फराळाचे पदार्थ आणि ते करण्याची पद्धत बदलते. खरे तर, काही पदार्थ हे त्या त्या राज्याची खासियत असते. दिवाळीमध्ये ते हमखास बनवले जातात. अशाच काही निवडक पदार्थांची ही खाद्यसफर.

महाराष्ट्राची चकली
खरे तर, चकली आणि तिची भाजणी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. त्यासाठी जिन्नसही नानाविध वापरले जातात. फक्त त्यासाठी प्रमाण योग्य हवे. तळताना गॅस जास्त मोठा आणि बारीक करूनही चालत नाही. त्या खुसखुशीत होण्यासाठी मध्यम आचेवर कटाक्षानं तळण्याचं कौशल्य हवं.
साहित्य : तांदूळ चार कप, हरभरा डाळ अर्धा कप, उडीद डाळ दीड कप, साबुदाणा पाव कप, जाड पोहे पाव कप, धने आणि जिरे प्रत्येकी दोन चमचे, मेथी दाणे अर्धा चमचा, तीळ दोन चमचे, लाल तिखट पाच चमचे, तेल दीड पाव कप, मीठ चवीनुसार, पाणी पाच कप.
कृती : सर्वांत प्रथम तांदूळ, डाळ, साबुदाणा, पोहे, मेथी दाणे, धने, जिरे भाजून त्याचं पीठ करा. तीळही भाजायचे. पाणी उकळायचं. त्यात तेल आणि मीठ घालायचं. मग पीठ घालून त्यात तिखट, तीळ आणि वरून अजून एक चमचा जिरं घाला. हे मिश्रण १० मिनिटं झाकून ठेवा. मग पीठ चांगलं मळून घ्या. नंतर चकली सोऱ्यातून काढा आणि तळा.
(Diwali Special Recipe दिवाळीसाठी घरच्या घरी तयार करा ‘हे’ स्पेशल ५ गोड पदार्थ)

बिहारी मालपुवा

साहित्य : कणिक एक कप, केळ एक, ओल खोबरं अर्धा कप, मिक्स ड्रायफ्रूट्स दोन चमचे, बडीशेप एक चमचा, वेलची पावडर दीड चमचा, दूध एक कप, तूप परतण्यासाठी.
पाकासाठी : साखर एक कप, पाणी तीन चतुर्थांश कप, वेलची पावडर अर्धा चमचा.
कृती : कणिक, केळ, खोबरं, वेलची पावडर, बडीशेप, ड्रायफ्रूट्स सर्व एकत्र करायचं. त्यात दूध घालून बॅटर तयार करा. एक तास झाकून ठेवा. ते थोडं फरमेंट होतं. एका पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळून एक तारी पाक तयार करा. बाजूला ठेवा. एका नॉनस्टिक पॅनवर तेल घालून मालपुवा करून दोन्ही बाजूनं फ्राय करून घ्या. पाकात घालून ते बाहेर काढा आणि सर्व्ह करा.
(सणासुदीच्या दिवशी बालूशाहीचा घ्या आस्वाद)

तामिळनाडूचा मुरुक्कू


साहित्य : तांदूळ पीठ चार कप, उडीद डाळीचं पीठ दोन कप, मीठ तीन चमचे, तेल पाव कप, जिरा दोन चमचे, हिंग पाव चमचा, खसखस तीन चमचे, पाणी पाच कप.
कृती : सर्वप्रथम पाणी उकळा. त्यात तेल, मीठ, हिंग, खसखस घालून तांदूळ पिठी आणि उडद डाळीचं पीठ घालून नीट एकत्र करा. दहा मिनिटं बंद करून ठेवा. पीठ नीट मळून त्याचा जाड शेवेसारखा आकार करून तळा.
(खारी शंकरपाळी, जाणून घ्या सोपी रेसिपी)

राजस्थानची मिठी मटरी


राजस्थानमध्ये छोटी दिवाळी आणी बडी दिवाळी साजरी केली जाते. म्हणजे नरक चतुर्दशी ही छोटी दिवाळी आणि पाडवा, भाऊबीज ही बडी दिवाळी. प्रत्येकाच्या घरी काही खास गोड आणि नमकीन पदार्थ केले जातात.
साहित्य : मैदा २५० ग्रॅम, साखर २५० ग्रॅम, तूप ५० ग्रॅम, पाणी एक कप, मटरी तळायला तूप.
कृती : सर्वप्रथम मैदा, तूप, थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. त्याचे छोटे चपटे गोळे करून तेलात किंवा तूपात तळून बाजूला ठेवा. एका कढईमध्ये साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करा. पाक थोडा गार झाला, की तळलेली मटरी पाकात घाला. २० मिनिटांनी बाहेर काढा. वरून पिस्ता, बदाम घालून सजवा.

बंगालमधली चेन्ना पायेश
बंगालमध्ये मुख्य दिवाळी ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी साजरी केली जाते. तिथं काली पूजा असं म्हटलं जातं. त्या दिवशी खास देवीची पूजा केली जाते. पारंपरिक पदार्थ केले जातात. रोषणाईही खास असते. तिथं हा खिरीचा प्रकार खूप लोकप्रिय आहे.
साहित्य : दूध अर्धा लीटर, कंडेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, साखर दोन चमचे, काजू आणि बदाम प्रत्येकी दोन चमचे, बेदाणे दोन चमचे, चेन्ना (पनीर) २५० ग्रॅम.
कृती : एका कढईमध्ये पाणी आणि साखर एकत्र करून शिजवा. गॅस बंद करून त्यात स्मॅश केलेलं पनीर म्हणजे चेन्ना घालून नीट एकत्र करा. एका कढईमध्ये दूध उकळा. त्यात कंडेन्स मिल्क घालून गरम करा. त्यात चेन्नाचं मिश्रण घालून परत दोन ते तीन शिजवा. वरून बदाम, काजू, बेदाणे घालून सर्व्ह करा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *