Health Care नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात

Spread the love

डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हा सामान्यपणे आढळणारा वातरोग (Arthritis Disease) आहे. यामध्ये सांध्यांना दीर्घकालीन वेदना व दाह होतो. स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. आकडेवारी बघायची झाली तर, एक हजार लोकांमागे सात लोक संधिवाताने त्रस्त असतात. हा महिलांमध्ये दोन-तीन पटीने अधिक आढळून येतो. संधिवात कुठल्याही वयात होऊ शकतो. मात्र, ४८ ते ६० वर्षे वयोगटात हा अधिक प्रमाणात आढळतो.

संधिवातामध्ये सांध्यांच्या लाइनिंगवर(सायनोव्हियम) परिणाम होऊन त्यावर वेदनादायक सूज येते, लालसरपणा येतो. कालांतराने सांधे झीजू लागतात व व्यंगत्व देखील येऊ शकते. सोबतच स्नायुबंध(टेंडन्स) व अस्थिबंध (लिगामेंट्स) कमजोर होतात. त्यामुळे देखील सांध्यांचा आकार बदलू लागतो. सुरुवातीला संधिवात हातांच्या व पायांच्या बोटांच्या सांध्यांवर आघात करतो. जसजसा वात वाढत जातो मनगट, गुडघे, हाताचे ढोपर, खांदे आणि मानेवर लक्षणे दिसू लागतात.

सामान्य लक्षणे
– सकाळच्या वेळेस अधिक वेदना आणि सांधे अकडणे.
– सांधे तापणे आणि लालसर होणे.
-सांध्यांवर सूज येणे.
– डोळे व तोंड कोरडे पडणे.
– थकवा व अशक्तपणा.
– सौम्य ताप असणे.
– त्वचेवर गाठी येणे.
– हातापायांना मुंग्या येणे.
– भूक कमी होणे.
(Health Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे)

अन्य अवयवांवर होणारा परिणाम…!
कालांतराने शरीरातील सर्व सांध्यांवर सूज येते, वेदना होऊ लागतात. शिवाय रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो, डोळ्यांमध्ये वेदना, लालसरपणा, प्रकाशाबद्दल संवेदनशीलता आणि कोरडेपणा निर्माण होतो. छातीमध्ये वेदना होण्यासोबत हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याच प्रकारे फुप्फुसांवरही प्रभाव होऊन श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

संधिवाताची कारणे..!

संधिवाताच्या कारणांचा उलगडा झाला नसला, तरी खालील कारणे साधारणपणे संधिवातास कारणीभूत ठरू शकतात.
– अनुवांशिकता : परिवारात कुणाला संधिवात असेल, तर अन्य सदस्यांना संधिवाताचा धोका असतो.
– वातावरणातील घटक : वातावरणातील काही जीवाणू (बॅक्टेरिया) व विषाणू (व्हायरस) संधिवाताला पुरक ठरू शकतात.
– जीवनशैली : धुम्रपानासारखी व्यसने आणि लठ्ठपणा देखील संधिवातास कारणीभूत ठरू शकतात.

रोगनिदान
वातरोगतज्ज्ञ शारीरिक तपासणी करून सांध्यांमधील सूज, लालसरपणा, सांध्यांची हालचाल करण्याची गती व क्षमता तपासतात. त्यावरून ईएसआर किंवा सीआरपी, रुमॅटॉइड फॅक्टर (आरएफ) सारख्या चाचण्या वातरोगतज्ज्ञ सुचवितात. आरएफ (रुमॅटॉइड फॅक्टर) चाचणी संधिवाताच्या सुरुवातीच्या टप्प्यात नकारात्मक (निगेटिव्ह) येऊ शकते. संधिवात असताना देखील सरासरी साठ ते ऐंशी वेळा चाचणी सकारात्मक (पॉजिटिव्ह) येते. त्यामुळे अधिक अचूक निदान करण्यासाठी अॅण्टी-सीसीपी अ‍ॅण्टीबॉडीजसारख्या रक्तचाचण्यादेखील केल्या जातात. सोबतच एक्स-रे, एमआरआय व अल्ट्रासाऊंड तपासण्यातून निष्कर्षांपर्यंत पोहचता येते. त्यावरून उपचाराची दिशा ठरते.
(Health Care वातरोग कोणत्या कारणामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार)

उपचारपद्धती

उपचारांचे ध्येय हे केवळ वेदनाशमन करण्यापुरते मर्यादित नसते. संधीवातामुळे पुढे होणारी गुंतागुंत आणि हानी टाळण्याचा प्रयत्न असतो. त्याशिवाय रोग्याची शारीरिक क्षमता पुनःप्राप्त करण्याचे ध्येय असते. हल्ली वेदनाशामक व स्टेरॉइडचा वापर कमी अथवा नाहीच्या बरोबरीनेच केला जातो. अत्याधुनिक उपचारपद्धती ‘डीमार्डस्’द्वारे ज्या पेशी संधिवातास कारणीभूत असतात, त्यांच्यावर प्रभाव पाडला जातो. जेणेकरून पुढील गुंतागुंत निर्माण होणार नाही. अलिकडे प्रसिद्धी पावलेले ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्विन’ हे डीमार्डस् प्रकारातील औषध आहे. याशिवाय मेथोट्रेक्सेट, लेफ्लुनोमाइड, सल्फासॅलाझाइन या देखील डीमार्डस् औषधी आहेत. ज्यांना डीमार्डसमुळे आराम मिळत नाही, त्यांना नवी जैविक(बायोलॉजिकल) औषधे देण्यात येतात.

औषधोपचारास पुरक जीवनशैली
औषधोपचारासोबत जीवनशैलीतील बदल उपचारासाठी आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

– व्यायाम :
व्यायाम केल्याने सांध्यांना गती व लवचिकता येते, वेदना कमी होतात, हाडांना व स्नायुंना बळकटता प्राप्त होते, हृदयविकार आणि अन्य गुंतागूंत कमी होते व भावनात्मक व मानसिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त होते. मात्र, व्यायामास सुरुवात करताना आपल्या वातरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

– ताणतणाव व्यवस्थापन :
संधिवातावर उपचार दीर्घकालापर्यंत करावे लागू शकतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण होतो. रोजच्या जीवनशैलीवर परिणाम पडतो. त्यामुळे आणखी ताण वाढतो. त्या अनुषंगाने ताणतणाव व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उदा. छंद जोपासणे, ध्यान करणे इ.

– आहार :
मासळी व ऑलिव्ह ऑइलसारखे ओमेगा-३ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे, ताज्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करणे, सोबतच कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी सारख्या घटकांनी युक्त पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य देणे; प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *