Health Care मणक्यांना होणारा वातरोग, जाणून घ्या उपचाराची पद्धत

Spread the love

डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिस हा एक प्रकारचा वातरोग आहे; ज्यामध्ये रुग्णाच्या पाठीच्या कण्याला आणि अस्थिबंदास (लिगामेंट्स) दाह व सूज येते. हळूहळू नव्या हाडांची निर्मिती होते आणि ते एकमेकांना चिटकू लागतात. कालांतराने सगळे मणके एक होऊन जातात, त्यास एंकीलॉसिंग असे म्हणतात. त्यामुळे या आजारास एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हा मणक्यांना होणारा वातरोग आहे.

आजार होण्यासाठी वयोमर्यादा नसली तरी १५ ते ३५ वयोगटातील व्यक्तींमध्ये हा सामान्यतः आढळून येतो. एकूण लोकसंख्येच्या ०.१ ते ०.२ टक्के लोकांना आजार होत असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांमध्ये हा आजार महिलांच्या तुलनेत पाच पटीने अधिक आढळतो.

अशी आहेत कारणे
अन्य वातरोगाच्या कारणांप्रमाणे याची कारणे देखील स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, काही व्हायरल इन्फेक्शन, पोटात होणारे प्रादुर्भाव इ. भौतिक कारणे यासाठी कारणीभूत ठरू शकतात. (एचएलए)-बी२७ या जनुकामुळे आजार होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय धुम्रपानासारख्या व्यसनांमुळेही हा आजार होऊ शकतो.

रोगाची लक्षणे

कंबरदुखी होणे, पार्श्‍वभागात आलटून पालटून वेदना होणे, मांड्यांमध्ये वेदना उमळणे ही प्राथमिक लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. एरवीदेखील आपल्याला अशा वेदना होत असतात. मात्र, या आजारातील वेदना मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक असतात, सकाळी कंबरेत अकडण राहते, जसजसा दिवस पुढे जातो वेदना आणि अकडण कमी होऊ लागते. एका जागी स्वस्थ बसल्याने अकडण व वेदना वाढतात आणि हालचाल केल्यास वेदना कमी होऊ लागतात. रात्री कड बदलण्यास त्रास होतो. कालांतराने या वेदना कंबरेपासून पाठीपर्यंत आणि मग मानेपर्यंत पोहोचतात. त्या व्यतिरिक्त हातापायाचे सांधे व टाचांमध्ये वेदना होतात व सूज येते. सांध्यांव्यतिरिक्त अन्य लक्षणांमध्ये लवकर थकवा येणे, डोळे वारंवार लाल होणे, छातीत वेदना होणे ही लक्षणेही आढळून येतात.

असे होत रोगनिदान
एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिस या वातरोगाचे निदान अन्य वातरोगांसारखेच होते. शारीरिक तपासणीनंतर रक्ताच्या चाचण्या व एक्स-रे, एमआरआयसारख्या तपासण्या वातरोगतज्ज्ञांद्वारे सुचविल्या जातात. एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिसचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणीदरम्यान सांध्यांची हालचाल व सूज, छाती फुगविण्याच्या क्षमता, कंबरेची लवचिकता तपासली जाते. रक्तचाचण्यांमध्ये ईएसआर, सीआरपी आणि रक्तामधील एचएलए-बी२७ जनुकाची चाचणी यांचा समावेश असतो. एचएलए-बी२७ ही रक्तचाचणी नव्वद टक्के रुग्णांमध्ये सकारात्मक (पॉझिटिव्ह) आढळून येते.

(Health Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे)

एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिसमुळे होणारी गुंतागूंत

डोळे वारंवार लालसर होणे (युव्हिआयटिस), पल्मोनरी फायब्रोसिस(फुप्फुसाला जाडपणा येणे), मोठ्या आतड्यांमध्ये दाह (कोलायटिस), हृदयविकार, सोरियासिससारखे त्वचाविकार आणि हाड ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरोसिस) सारखी गुंतागूंत निर्माण होण्यास एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिस कारणीभूत ठरतो.

उपचाराची पद्धत
उपचारांचे प्राथमिक ध्येय हे वेदनाशमन असले, तरी व्यंगत्व येण्यासाठी कारणीभूत असलेली सांध्यांची हानी टाळणे आणि शारीरिक क्षमतेची पुनःप्राप्ती करणे, हे उपचारांचे मुख्य लक्ष्य असते. औषधोपचार, फिजिओथेरपी आणि शेवटी शस्त्रक्रिया या तीन मुख्य उपचारपद्धती आहेत.
(Health Care वातरोग कोणत्या कारणामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार)

स्टिरॉईड नसलेली वेदनाशामक औषधे ही औषधोपचारांची पहिली पायरी आहे. डीमार्डस औषधे ही हातापायांच्या सांध्यांना आलेली सूज व वेदना कमी करण्यात प्रभावी ठरतात. स्टेरॉईडचा वापर अत्याधिक वाढलेला दाह आणि डोळ्यात झालेल्या वाताच्या दुष्परिणामाला कमी करण्यास केला जातो. आणखी प्रभावी उपचारासाठी नवीन आलेली जैविक (बायोलॉजिकल) औषधांचा उपयोग वातरोगतज्ज्ञांद्वारे केला जातो.

वेदना कमी करण्यासाठी वातरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शारीरिक व्यायाम, फिजिओथेरपी, मसाज सारख्या प्रणालींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हालचालीत वेग येतो. स्नायुंमध्ये शक्ती निर्माण होते. सोबतच फुप्फुसांचे क्षमतावर्धन होते व हृदय देखील सशक्त होते. जलतरण हा एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिसच्या रुग्णांसाठी उत्कृष्ट व्यायामाचा प्रकार आहे.
(Health Care नियमित व्यायाम, उपचाराने करा संधिवातावर मात)
जीवनशैलीतील करा बदल
औषधोपचार आणि व्यायाम करण्यासोबतच जीवनशैलीत काही बदल करणे अत्यावश्यक असते. काम करताना योग्य पद्धतीने बाक न काढता उभे राहणे, झोपताना देखील योग्य प्रकारे झोपणे आवश्यक आहे. अतिरिक्त काम करून स्वतःला अधिक थकवा येईल, असे कार्य टाळावे. लठ्ठपणा आणि धुम्रपान टाळावे. झोपण्यासाठी फार मऊ अथवा फार कडक गादीचा वापर टाळावा. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांचे सेवन टाळावे. कॅल्शियम, व्हिटॅमीन-डी आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंटयुक्त आहाराचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे.

एकूणच जीवनशैली व औषधोपचार यांचा समतोल साधला तर एंकीलॉसिंग स्पॉन्डीलाइटिसवर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *