Health Care Tips गर्भधारणेपूर्वी घ्या वातरोगतज्ज्ञांचा सल्ला

Spread the love

डॉ. परीक्षित सगदेव, वातरोगतज्ज्ञ, नागपूर

वातरोग महिलांमध्ये सामान्यतः आढळून येतो. प्रजननास सुयोग्य वय असलेल्या महिलांमध्ये वातरोग अधिक प्रमाणात आढळून येतो. जर वातरोगामुळे आई होण्यास काही अडथळा निर्माण झाला, तर मानसिक त्रासालादेखील सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे. गर्भधारणा होईल की नाही, होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होईल का, वातरोगासाठीच्या औषधांनी काही दुष्परिणाम होईल का, अशा अनेक शंका वातरोगग्रस्त महिला आणि तिच्या जोडीदाराच्या मनात असतात. यामुळे गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी वातरोगतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. या लेखातून आपण वातरोग आणि गर्भधारणा याबाबत चर्चा करणार आहोत.

गर्भधारणेचे वातरोगांवर होणारे परिणाम

शंभराहून अधिक प्रकारचे वातरोग आहेत. प्रत्येक वातरोगावर गर्भधारणेचा परिणाम भिन्न असू शकतो. उदा. संधिवाताच्या रुग्णांमध्ये गर्भधारणा झाल्यावर वाताचे प्रमाण कमी होते. या काळात त्यांना औषधांची गरज कमी पडते. प्रसूतीनंतर मात्र, वातरोग वाढण्याची शक्यता निर्माण होते. ‘एसएलई’सारख्या (लुपस) वातरोगामध्ये गर्भधारणेच्या दुसऱ्या टप्प्यात वातरोग वाढण्याची शक्यता असते. अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये पन्नास टक्के रुग्णांमध्ये गर्भधारणेदरम्यान आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेचा विविध वातरोगांवर परिणाम हा भिन्न असू शकतो.
(Health Care मणक्यांना होणारा वातरोग, जाणून घ्या उपचाराची पद्धत)

वातरोगाचे गर्भधारणेवर होणारे परिणाम
वातरोग असलेल्या महिलांना गर्धधारणा होतांना गुंतागूत निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. ‘लुपस’सारख्या वातरोगांमध्ये गर्भधारणा झाली तरी वारंवार गर्भपात होतो. त्यादरम्यान रक्तदाब देखील वाढू शकतो. काही अँटिबॉडीज अथवा स्जोग्रेन सिंड्रोम असल्यास बाळाला शिशूवस्थेत लुपस अथवा जन्मतः हृदयात ‘ब्लॉक’ असू शकतात. जन्मतः बाळाला वातरोग होईल का अशी भीतीदेखील असते. मात्र, आधीच्या भागांमध्ये बघितल्याप्रमाणे अनुवांशिकता हे एक कारण असले, तरी अन्य भौतिक कारणांचा संयोग होऊन वातरोग संभवतो. त्यामुळे होणाऱ्या बालकास वातरोग होईलच, असे सांगता येत नाही. याशिवाय वातरोगग्रस्त महिलांना वेळेपूर्वी प्रसूती होण्याचा धोका संभवतो. शिवाय बाळाचे वजन इतर बाळांच्या तुलनेत कमी असू शकते. वातरोगग्रस्त महिलांमध्ये सिजेरियन होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आलेले आहे.
(Health Care वातरोग : समज-गैरसमज, जाणून घ्या १२ प्रश्नांची उत्तरे)

औषधोपचार
वातरोगाची औषधे बंद करूनच गर्भधारणा करायला हवी, असा एक गैरसमज रुग्णांमध्ये आढळतो. मात्र, असे केल्यास गुंतागूंत अधिक वाढू शकते. वातरोग नियंत्रणात असेल तरच गर्भधारणेदरम्यान गुंतागूंत निर्माण होण्याची शक्यता कमी होते. काही औषधे गर्भधारणा व प्रसुतिदरम्यान निश्‍चितच धोकादायक ठरू शकतात. मात्र, काही औषधे निश्‍चित सुरक्षित आहेत. त्यांच्या सेवनाने वातरोग नियंत्रणात राहतो आणि गर्भधारणेदरम्यान अडचण येत नाही.
(Health Care वातरोग कोणत्या कारणामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार)

वातरोगतज्ज्ञांचा सल्ला
गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी वातरोगतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. कारण गर्भधारणेपूर्वी चार ते सहा महिने वातरोग पूर्णपणे नियंत्रणात असला पाहिजे. गर्भधारणेचे नियोजन असल्याचे वातरोगतज्ज्ञांना सांगितल्यावर ते सुरक्षित औषधे देता. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान व नंतरही त्रास होत नाही. यासोबतच वातरोगतज्ज्ञ वातरोगांचा अन्य अवयवांवर झालेला परिणाम तपासण्यासाठी काही चाचण्या सुचवितात. त्याद्वारे शरीराची गर्भधारणेसाठी स्थिती अनुकूल आहे की नाही हे कळू शकते.

अशी घ्या काळजी…

– वातरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गर्भधारणेचे नियोजन करावे.
– वातरोग अनियंत्रित असेल, तर गर्भधारणेचा प्रयत्न करू नये. वातरोगग्रस्त व्यक्तीवर गर्भधारणेचे दडपण आणू नये.
– उपचारांनंतरही काही प्रमाणात गुंतागूंत निर्माण धोण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अन्य लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
– ताणतणावावर नियंत्रण ठेवावे. औषध वेळेत घेणे आवश्यक.
– निरोगी आहार घेण्यास प्राधान्य द्यावे आणि वजनावर नियंत्रण ठेवावे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *