Health Care Tips पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास

Spread the love

डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे, युरोलॉजिस्ट, नागपूर

आपल्या मूत्रमार्गाला अनेक व्याधी ग्रस्त करू शकतात. मूत्रपिंडापासून ते जननेंद्रियांपर्यंतच्या मार्गाच्या विकारांचा अभ्यास आणि उपचार युरोलॉजिस्ट करीत असतात. या विकारांमध्ये मूत्रपिंडातील खडे, मूत्रमार्ग आकुंचन पावणे, मूत्रपिंडाचा टीबी, मूत्रपिंडाचे अनुवांशिक आजार, युरेटरमधील स्टोन, लघवीच्या पिशवीचे विकार, ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर (वारंवार लघवी लागणे), मूत्रमार्गात जंतूसंसर्ग, लघवीच्या पिशवीचे कर्करोग अशा विकारांचा समावेश होतो.

वयोमानानुसार लघवीच्या समस्या वाढू लागतात. लक्षणांमध्ये वाढ ही सौम्य गतीने होत असल्या कारणाने रोग ओळखण्यास उशीर होतो. अशाच प्रकारे वृद्धपकाळात एक समस्या उद्भवू लागते; ती म्हणजे प्रोस्टेटची होणारी वाढ…!
(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)

पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या खाली प्रोस्टेट ग्रंथी स्थित असते. त्यास पौरुष ग्रंथी असेही म्हणतात. ही जन्मतः दहा ते पंधरा ग्रामची असते. पुरुषांच्या शरीरातून टेस्टॉस्टरॉन हे संप्रेरक स्त्रवत असते. त्याच्या प्रभावामुळे आणि जसजसे वय वाढते ही ग्रंथी मोठी होत जाते. लघवीच्या थैलीतून निघणारा मूत्रमार्ग (युरेथ्रा) प्रोस्टेट ग्रंथीच्या मधून जात असतो. ही ग्रंथी मोठी झाली की, मुत्रमार्गावर दाब येतो. त्यामुळे लघवीचा वेग कमी होतो. सोबतच लघवीच्या थैलीवर दाबदेखील येतो. एकूणच प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्ग बंद होतो व त्रास सुरू होतात.

लक्षणे

प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे होणारा त्रास हा दोन कारणांनी असतो एक म्हणजे वाट अडकल्यामुळे आणि दुसरे म्हणजे लघवीच्या पिशवीवर अधिक ताण(प्रेशर) निर्माण झाल्यामुळे. अधिक ताण पडल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी रोखता न येणे, रात्रीस लघवीची वारंवारता वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. वाट अडकल्यामुळे लघवी तुटून-तुटून होणे, कधी-कधी लघवी पूर्ण थांबून जाणे, लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होत राहणे, कधी-कधी छोटे खडे बाहेर पडणे ही लक्षणे आढळून येतात. याशिवाय प्रोस्टेट वाढल्याने मूत्रपिंड निकामे होणे, हात-पाय- चेहऱ्यावर सुज येणे, रक्त जाणे, निरंतर खडे तयार होणे, लघवी पूर्णपणे थांबून जाणे अशा गुंतागुंत निर्माण होतात.
(Time Management प्राधान्यक्रम ठरवा, नियोजन करा!)

रोगनिदान

लक्षणांच्या आधारावर प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे की नाही याचे निदान युरोलॉजिस्ट करीत असतात. वैद्यकीय परिक्षण आणि चाचण्यांच्या आधारे प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचा त्रास सौम्य, मध्यम आणि तीव्र प्रकारात मोडला जातो. त्यासाठी सोनोग्राफी, लघवीच्या प्रवाहाच्या वेगाची चाचणी आणि त्याचा मूत्रपिंडावर पडणारा ताण, तसेच लघवीच्या थैलीचे प्रेशर तपासण्यासाठीची चाचणी अशा काही चाचण्या केल्या जातात. रक्तातील एक घटक पीएसए वाढले असल्यास प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता असते. सामान्यतः पन्नासी ओलांडलेल्या पुरुषांनी याची चाचणी किमान एकदा तरी करवून घेतली पाहिजे.
(Health Care मणक्यांना होणारा वातरोग, जाणून घ्या उपचाराची पद्धत)
उपचारपद्धती
प्रोस्टेट ग्रंथी वाढीचा त्रास तीन प्रकारात विभागल्या जातो; सौम्य, मध्यम व तीव्र…! जीवनशैलीत बदल केल्यास केल्यास सौम्य त्रास कमी होऊन जातो. मात्र जीवनशैलीत खालील बदल करावेत

-चहा-कॉफी व मद्याचे सेवन टाळणे.
– ज्यांना जोखीम आहे त्यांनी रात्री आठ नंतर पाणी न पिणे.
– दिवसभर लघवी मुळीच थांबवू नये.
– नियमित व्यायाम करणे.
– शौचास होणे; बद्धकोष्ठता टाळणे.
– चिंता व ताणरहीत जगणे.

जीवनशैलीत बदल केल्याने त्रास कमी झाला नाही तर औषधोपचार करावा लागतो. बहुतांश रुग्णांना औषधोपचाराने आराम मिळतो. मात्र, औषधे दीर्घ काळापर्यंत घ्यावी लागू शकतात.

एंडोस्कोपी शस्त्रक्रिया (टीयूआरपी)
काही रुग्णांना लघवीत वारंवार रक्त जाणे, लघवी थांबून जाणे, लघवीला नळी टाकावी लागणे, लघवीत प्रोस्टेटमुळे खडे तयार होणे ही लक्षणे आढळली तर प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रिया पूर्णपणे दुर्बिणीने म्हणजे एंडोस्कोपिक पद्धतीने लघवीवाटेच होते. यात एकही टाका लावावा लागत नाही. प्रोस्टेट पूर्ण काढल्या जात नाही. लघवीच्या युरेथ्राला प्रोस्टेट ग्रंथींच्या मधून वाट बनवून दिली जाते. मुत्रमार्गातील वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीचा अडथळा कमी झाल्याने मुत्रप्रवाह पूर्वत होतो. एक लक्षात घ्या की, शस्त्रक्रियेची गरज प्रत्येकाला नसते. ज्यांना औषधांनी आराम मिळत नाही; त्यांच्यावरच शस्त्रक्रिया करावी लागते. याशिवाय खुली शस्त्रक्रिया आणि लेजर शस्त्रक्रियेचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

(या लेखातील माहिती डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे यांनी लिहिलेली आहे.)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *