Health Care Tips मुतखडा (किडनी स्टोन) : वेळीच उपचार आवश्यक

Spread the love

-डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे, युरोलॉजिस्ट, नागपूर

मुतखड्यांची शस्त्रक्रिया झाली अथवा किडनी स्टोन (kidney stone) निघाला, असे वाक्य आपल्या ऐकिवात असेलच. नात्यातल्या अथवा जवळच्या व्यक्तींला किडनी स्टोन झाल्याचे आपल्या लक्षातही असेल. किडनी स्टोन हा अतिशय सामान्य विकार आहे; त्यास मराठीत ‘मुतखडा’ असेही म्हणतात. सोनोग्राफी केली तर आजही आपल्या मूत्रपिंडात दोन मिलीमीटर आकारापर्यंतचे खडे आढळतील. अनेकदा आपल्या नकळत हे खडे बाहेर निघून जातात. अथवा विरघळून जातात. मात्र, या खड्यांचा आकार जेव्हा वाढतो तेव्हा अन्य गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे मुतखड्यांचा वेळेत उपचार करून घेणे अत्यावश्यक आहे.

…मुतखडे का होतात?

मूत्रपिंडे आपल्या शरीरात रक्तशुद्धीचे कार्य करीत असतात. जेवणाद्वारे सेवन करीत असलेले अनेक पदार्थ मूत्रपिंडातून सतत फिल्टर होत असतात. त्यामध्ये कॅल्शियमसारखा क्षारदेखील असतो. या फिल्टरदरम्यान क्षारांचे प्रमाण वाढल्याने ते मूत्रपिंडात साचून हळूहळू खडे तयार होतात. प्रमाणात पाणी प्यायल्याने ते लघवीवाटे गळून जातात. मात्र, पाणी कमी पिण्यात येत असेल, क्षारयुक्त पदार्थांचे आहारात प्रमाण अधिक असल्यास, आतडे आदींची शस्त्रक्रिया झाली असेल तर मुतखडे बनण्याची शक्यता अधिक असते.
(Health Care Tips पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास)
-मुतखड्यांचा आकार आणि वेदना
मुतखड्याचा आकार हा सरासरी चार मिलीमीटर ते चार सेंटीमीटरपर्यंत असू शकतो. अलिकडे सात सेंटीमीटर म्हणजे एका छोट्या वाटी एवढा मुतखडा बाहेर काढला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, मुतखड्यादरम्यान होणाऱ्या वेदना या मुतखड्याच्या आकारावर अवलंबून नसतात. मोठा मुतखडा म्हणजे अधिक वेदना असे समीकरण नसते. याउलट लहान खडे अनेकदा अधिक वेदना आणि गुंतागूंत निर्माण करू शकतात. त्यामुळे मुतखडा मोठा आहे की छोटा, यापेक्षा तो खडा कुठल्या भागात आहे; यावर वेदना व गुंतागूंत अवलंबून असते.

धोका कुणाला..?
– उच्चरक्तदाब अथवा मधुमेहग्रस्त रुग्णांना मुतखडा बनण्याची शक्यता अधिक असते.
– जेवणात एकच पदार्थ वारंवार येत असेल; जसे अत्याधिक मांसाहार, गरजेहून अधिक प्रथिनांचे (प्रोटिन) सेवन
-हॉर्स शू किडनी, मालरोटेटेड किडनी (जन्मतः उलटे मूत्रपिंड), मूत्रपिंडातील नस जाम होणे अथवा मूत्रपिंडाचे अनुवांशिक विकार असलेल्यांना
– वारंवार लघवीचे संसर्ग होत असल्यास
– आतड्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना
– वैद्यकीय सल्ल्याशिवाय कॅल्शियम औषधांचे सेवन केल्याने
-लठ्ठपणामुळे, किंवा जलद वजन कमी केल्याने
– प्रथिनांचे अनियमित सेवन करणारे; डाएट फॅडमुळे
-अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांमध्ये
(तोडा वेदनेची शृंखला! व्याधींना दूर ठेवण्यासाठी करा हे उपाय)

लक्षणे काय?
सामान्यतः मुतखडे कुणाला होईल सांगता येत नाही. पहिल्यांदा दुखल्यावर एखाद-दोन दिवसात वेदना कमी होत नसतील, तर किंबहुना मुतखड्याची शक्यता असते. खडा मूत्रपिंडात असेल, तर पोटाच्या वरच्या भागाशी जुळलेल्या पाठीच्या भागात वेदना होतात. सुरुवातीला दुखणे ठसठसल्यासारखे असते. या वेदना मुतखड्याचे संकेत देत असतात. वेदना कधी कधी पाठीकडून पोटाकडे येतात. याशिवाय लघवीच्या रस्त्याकडे जाणारे, वृषणाकडे जाणारे अथवा लिंगाच्या टोकाकडे जाणारे दुखणे देखील मुतखड्याची लक्षणे दर्शवितात.
(Health Care Tips वृद्धापकाळात कर्करोगाशी लढाई)
त्याचप्रकारे वारंवार यूरीन इन्फेक्शन होणे हे देखील एक लक्षण आहे. अशा प्रकारच्या वेदना होत असतील तर सोनोग्राफीद्वारे आपल्याला मुतखड्याचे निदान करता येते.

याशिवाय मुतखड्यांमध्ये खालील लक्षणे आढळतात.
-लघवीतून रक्त जाणे
-वारंवार लघवीला जावे लागणे
-लघवी अपुरी झाल्याची भावना असणे
-लघवी कमी होणे
-हातापायावर सूज येणे हे त्रास असू शकतात
-लघवीतून छोटे खडे पडणे
-पांढरा फेस पडणे हे स्टोनचे लक्षण आहे

अनेकदा तर वरीलपैकी कुठलीही लक्षणे आढळत नाहीत. अन्य उपचारांसाठी जेव्हा मूत्रतपासणी अथवा सोनोग्राफी केली जाते तेव्हा मुतखडा असल्याचेही बहुतांश वेळा आढळून आले आहे.

पुढील भागात आपण मुतखड्यासंबंधीचे गैरसमज जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *