Health Care Tips रेटीनोपॅथीने लहान मुलांमधील नेत्ररोगांवर करा मात

Spread the love

डॉ. प्रफुल्ल मोकदम, नेत्ररोगतज्ज्ञ, नागपूर
रेटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरीटी‘ हा, फारसा माहित नसलेला एक नेत्रविकार आहे. गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) अर्भकांमध्ये ही नेत्र व्याधी आढळते. आईच्या पोटांत पूर्ण नऊ महिने राहिलेले बाळ शारीरिकदृष्ट्या पूर्णत: तयार झालेले असते. अशा बाळाचे डोळे दोषरहित असतात. याउलट गर्भावस्थेचे २८ ते ३० आठवडे पूर्ण होण्यापूर्वी जन्मलेली किंवा जन्माच्यावेळी वजन दीड किलोपेक्षा कमी असलेली बालके जन्मत:च कमकुवत म्हणजे ‘प्रीमॅच्युअर’ असतात. त्यांच्या डोळ्यांची पुरेशी वाढ झालेली नसते. विशेषत: डोळ्याचा अंतर्पटल (म्हणजे रेटीना) अजून पूर्णावस्थेला आलेला नसतो. हे प्रीमॅच्युअर मूल जन्मल्यानंतर रेटीनाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची वाढ थांबलेली असते. त्यामुळे रक्तपुरवठा वाढावा या उद्देशाने शरीरातील ‘व्हास्क्युलर एंडोथीलीयल ग्रोथ फॅक्टर’ (व्हेजफ) रेटीनामध्ये नवीन रक्त वाहिन्या निर्माण करू लागतो.

या नवीन रक्तवाहिन्या कमकुवत असतात. परिपक्व नसल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुटून डोळ्याच्या आत रक्त जमा होते. यामुळे फायब्रोसिस होऊन रेटीना ताणली जाते आणि रेटीनल डिटॅचमेंट (रेटीनाचे निखळणे) होऊन मुलाला नेहमीसाठी अंधत्व येऊ शकते.

अशा बालकांची, नेत्र तज्ज्ञाकडून जन्मानंतर लगेच तपासणी करून घेणे आवश्यक असते. रेटीनाच्या तपासणीत अनैसर्गिक, कमकुवत रक्त वाहिन्या आढळल्यास रेटीनाचा विशिष्ट लेझर वापरून इलाज करावा लागतो. त्यामुळे असा लेझर आणि त्याचा वापर करण्याची क्षमता असलेल्या रेटीना तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. ही लेझर प्रक्रिया करण्यास विलंब घातक ठरू शकते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात वर्षाकाठी साधारण १५०० बालकांना आरओपीमुळे अंधत्व येते.
(हृदय विकार दूर ठेवण्यासाठी नियमित खा दोन अक्रोड, जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ)

प्रत्येक ‘प्रिमॅच्युअर’ बालकाची रेटीना तज्ज्ञाकडून वेळीच तपासणी होणे हे त्यामुळे अत्यावश्यक आहे. सात महिन्याच्या बाळाला लेझर करताना बेशुद्ध करता येत नाही. त्याने हालचाल करू नये म्हणून त्याला मऊ कापडात गुंडाळावे लागते. डोळ्याची संवेदना कमी करण्यासाठी डोळ्यात सतत ‘टॅापीकल ॲनास्थेशिया’च्या थेंबांचा वापर करावा लागतो. बालरोग तज्ज्ञाची उपस्थिती आवश्यक असतेच. इतर शारीरिक व्याधींमुळे काही बालके लेझर करण्यास योग्य नसतात. त्यांना डोळ्याच्या आत महागडी ‘ॲण्टी व्हेजफ’ इंजेक्शन देण्याचा तात्पुरता पर्याय असतो. या इंजेक्शनमुळे नवीन रक्तवाहिन्याची वाढ होण्याला तात्पुरता मज्जाव होतो. रेटीनाच्या आत आधीच तयार झालेल्या कमकुवत रक्तवाहिन्यांचा नि:पात पुढे कधीतरी लेझरने करावाच लागतो.
(Health Care Tips किती मिनिटे करावा मॉर्निंग वॉक? नियमित व्यायाम केल्यास आरोग्याला मिळतील हे लाभ)

प्रिमॅच्युअर बाळाला श्वासाचा किंवा इतर दुसरा काही त्रास असेल तर ऑक्सिजन देणे आवश्यक असते. अती जास्त ऑक्सिजन देण्यामुळे सुद्धा आरओपी होऊ शकतो. अती ऑक्सिजन देण्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व पूर्वी अनेक बालकाना येत असे. लेझर केल्यानंतर दोन किंवा तीन आठवड्यांनी, पुढे सहा महिन्यानंतर आणि नंतर वर्षांतून एकदा रेटीनाची तपासणी करावी लागते. अशा मुलांना, मायोपियामुळे, लहान वयांत चष्मा लागू शकतो.
(उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? किडनीचं आरोग्य जपणं का आहे आवश्यक ? जाणून घ्या)

त्यामुळे अक्षर ओळख आली की नेत्र तज्ज्ञाकडून वार्षिक तपासणी करणे आवश्यक असते. पन्नाशीनंतर येणारे काचबिंदु (ग्लाकोमा) सारखे डोळ्याचे आजार अशा व्यक्तींमधे होऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांनी नेहमीच डोळ्यांच्या बाबतीत सतर्क असायला पाहिजे. स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ (निओनॅटॅालॅाजिस्ट), नेत्रतज्ज्ञ(रेटीना तज्ज्ञ) आणि सुजाण पालक यांच्या समन्वयामुळे आरओपीमुळे उद्भवणाऱ्या अंधत्वावर मात करता येते. अर्थात, जन्मानंतर लगेच डोळ्यांची तपासणी आणि सर्व सुविधांनी सज्ज अशा रेटीना तज्ज्ञाकडून इलाज होणे हे महत्त्वाचे ठरते.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *