Health Care Tips वृद्धापकाळात कर्करोगाशी लढाई

Spread the love

डॉ. आशिष भांगे, कर्करोगतज्ज्ञ, नागपूर

कर्करोग हा शब्द ऐकला की सामान्य लोकांच्या मनात धडकी भरते. म्हातारपण सोबतीला असले की भीती अधिकच वाढते. आज आपण ज्येष्ठ नागरिकांमधील कर्करोगासंबंधी चर्चा करणार आहोत. तीनपैकी दोन रुग्णांना ‘डीएनए’स्तरावरील त्रुटींमुळे कर्करोग होत असल्याचे आढळले आहे. ‘जीन्स’च्यास्तरावरील त्रुटींमुळे अथवा वयोमानानुसारही कर्करोग होत असल्याचे समोर आले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार मागील ५० वर्षांत मानवाचे सरासरी वयोमान ५५.३ वर्षांवरून ७१.६ वर्षांपर्यंत वाढले आहे.

८.५ टक्के लोकसंख्या ही ६५ वर्षांहून अधिक आहे. वर्ष २०३५पर्यंत दरवर्षी एक कोटीहून अधिक लोकांना कर्करोग होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आजही मुख कर्करोगामुळे जगभरात दरवर्षी तीन लाख मृत्यू होतात. विशेष म्हणजे या कर्करोगाचे २५ टक्के रुग्ण हे ७० वर्षांहून अधिक वयाचे असतात. आकडेवारी असे सांगते की, ज्येष्ठांच्या समस्यांमध्ये कर्करोग ही समस्या आवासून उभी राहत आहे.
(Cancer Treatment कर्करोग उपचारांनंतरचे जीवन)

वृद्धापकाळात कर्करोग बरा होत नाही असा गैरसमज आपल्या समाजात आहे. एक ज्येष्ठ नागरिक वयाच्या ७०व्या वर्षात जीभेच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. कर्करोग पुन्हा होऊ नये म्हणून रेडिएशन थेरपीला सामोरे जावे लागले. जुन्या पद्धतीच्या रेडिएशन थेरपीमुळे होणाऱ्या असह्य वेदनेमुळे त्यांनी रेडिओथेरपी अर्ध्यातच सोडली. उपचार पूर्ण केला नाही तर कर्करोग पुन्हा उद्‌भवण्याची शक्यता असते आणि घडलेही तसेच, कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले. यावेळी देखील जुन्या उपचारांच्या आठवणी व वेदनांमुळे उपचार करण्यास मानसिकदृष्ट्या ते तयार होत नव्हते. पण त्यांचे समुपदेशन केले आणि रेडिएशन थेरपी उपचार पूर्ण करण्यास ते तयार झाले.
(Cancer Causes And Treatment कर्करोग : नवा दृष्टिकोन)

आता उपचाराअंती ते ठणठणीत बरे झालेत. ही एकाच नव्हे तर अनेक आजोबांची गोष्ट आहे. देशभरात अनेक रुग्णांनी उतारवयात कर्करोगावर मात केली आहे. अर्थात ज्येष्ठ नागरिकांच्या कर्करोगावर उपचार करणे हे एक आव्हान आहे. अशक्य मात्र नाही. वृद्धापकाळात कर्करोगाच्या उपचारादरम्यान वाढत्या वयात उपचार सहन करण्याची क्षमता, वयोमानानुसार उद्भवणारे अन्य आजार जसे मधूमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडांच्या समस्या, हृदयविकार त्याचप्रमाणे आर्थिक आणि मानसिक सहाय्य ही आव्हाने आहेत. या सर्व घटकांचा सारांश काढायचा असेल तर तो ‘कॉम्प्रहेंसिव्ह जेरिएटिक असेसमेंट’ (सीजीए) स्कोरद्वारे काढला जातो. त्याच्या निष्कर्षानुसार आपण ठरवतो की, उपचार क्युरेटिव्ह (संपूर्ण बरे होण्यासाठीचा उपचार) की पॅलिएटिव्ह (त्रास कमी होण्यापुरता उपचार) करायचेत. एकदा हे ठरले की उपचारास सुरुवात होते.
(Exercise For Health हवा रोजच्या रोज व्यायाम, कारण…)

ज्येष्ठांवर उपचार करताना घेतली जाणारी विशेष काळजी
१. शारीरिक क्षमतेनुसार उपचार पद्धतीचे नियोजन.
२. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, किमोथेरपीच्या अनुषंगाने आधुनिक उपचारपद्धतींचे अवलंबन.
३. अ‍ॅडप्टिव्ह रेडिओथेरपी म्हणजे ज्या भागावर आवश्यक आहे, तेवढ्याच लक्ष्यावर केंद्रित करणारी रेडिओथेरपी करण्यास प्राधान्य.
४. आहाराविषयी योग्य समुपदेशन.
५. शारीरिक स्थिरतेसाठी (फिजिकल फिटनेस) नियमित फिजिओथेरपी आणि मानसिक समुपदेशन.

या बाबींना प्रभावीपणे अमलात आणल्या तर कर्करोगावर यशस्वीपणे मात करणे शक्य आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ वयात कर्करोग झाला तरी घाबरून न जाता कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. जगण्याच्या प्रेरणेतूनच कर्करोगाच्या लढाईवर अर्धा विजय मिळालेला असतो हे मात्र लक्षात ठेवा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *