Women Health Care महिलांच्या आरोग्य समस्या

Spread the love

डॉ. अनघा कुलकर्णी-केकतपुरे, युरोलॉजिस्ट, नागपूर
मूत्रमार्गाचे व जननेंद्रियाचे रोग महिलांमध्ये सामान्यतः आढळणारे विकार आहेत. चार महिलांपैकी एका महिलेला हे विकार असल्याचे आढळते. यावर उपचार करणारे डॉक्टर पुरुष असल्याकारणाने, उपचार करून घेताना ‘लाज’ आडवी येते. या सगळ्यांमुळे महिला युरोलॉजिस्टपर्यंत पोहचेपर्यंत, त्यांचा त्रास वाढलेला असतो. खरे तर हा त्रास जीवघेणा नसतो. मात्र, महिलांच्या जीवनाची गुणवत्ता खालावते. सतत पॅड्स वापरावे लागतात, घराबाहेर जाणे कठीण होऊ लागते; त्यामुळे जगणे असह्य होऊ लागते.

महिलांच्या मूत्रमार्ग व जननेंद्रियांमध्ये सामान्यतःहे विकार आढळतात.
– पेल्व्हिक ऑर्गन प्रोलॅप्स : यामध्ये गर्भाशय आपल्या मूळ जागेपासून खाली उतरते. त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.
– स्ट्रेस युरिनरी इंकॉन्टिनंस : म्हणजे मूत्रमार्गातील असंयमित ताण; त्यामुळे खोकल्यावर, शिंकल्यावर अथवा वजन उचलल्यावर लघवीवरील नियंत्रण सुटते.
– ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम : ओव्हर अ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोममध्ये लघवीवर नियंत्रण राहत नाही. तातडीने लघवीला जाण्याची इच्छा होते किंवा थेंबथेंब लघवी गळण्यास सुरुवात होते.
– इंटरस्टिशियल सिस्टायटिस : याला ब्लॅडर पेन सिंड्रोम असेही म्हणतात. लघवीदरम्यान तीव्र स्वरुपाच्या वेदना होतात. किंबहुना मूत्रमार्गाद्वारे रक्तदेखील जाऊ शकते.
– जनायटल फिश्युला : लघवीच्या पिशवीपासून गर्भपिशवीपर्यंत एक मार्ग तयार होतो. त्याद्वारे लघवी सतत गळत राहते. कमी वयात होणारी प्रसुती यासाठीचे मुख्य कारण आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाचे कर्करोग अथवा शस्त्रक्रिया देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
(Health Care Tips आत्मविश्वास वाढण्यासाठी या चुका करणं टाळा)
कारणे : लहान वयात प्रसुती होणे, दीर्घकाल चालणाऱ्या प्रसुतीवेदना, फोरसेप्स या यंत्राद्वारे केल्या गेलेली प्रसुती, बाळाचा आकार सामान्यापेक्षा मोठा असणे, गर्भारपणादरम्यान अपुरा आहार अशी कारणे महिलांच्या मूत्रमार्गाच्या रोगांना कारणीभूत असतात. गर्भाशय काढून टाकल्यानेदेखील हे विकार होऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने मूत्रमार्गातील स्नायुंची ताकद कमी होते. याशिवाय फुप्फुसाचे आजार, मधुमेह, लठ्ठपणा हे घटकही कारणीभूत ठरू शकतात. भारतामध्ये लहान वयात होणारी प्रसुती आणि एकाधिक प्रसुती, हे मूत्रमार्गाच्या विकारांसाठीचे मुख्य कारण आहे.
(Neck Pain Exercise मानदुखी टाळण्यासाठी करा या ५ गोष्टी)

लक्षणे : गर्भाशय खाली येत आहे असे जाणवणे, ओटीपोटात वेदना होणे, लघवी पूर्ण न होण्याची भावना असणे, वारंवार जावे लागणे किंवा नियंत्रण न राहणे, मूत्रमार्गाला सतत प्रादुर्भाव (इंफेक्शन) होत राहणे, हा रोग इतका वाढतो की या स्त्रिया कुठेही गेल्यावर पहिले बाथरुम शोधतात. त्यांना कार व बसचा प्रवास देखील नकोसा वाटतो. शेवटी नाईलाजास्तव डायपर वापरणे भाग पडते.
(Health Care मूड चांगला राहण्यासाठी करा या ७ गोष्टी)

उपचारपद्धती :

या विकारांचे रोगनिदान व उपचार करण्यासाठी मल्टीमॉडल म्हणजे बहुआयामी पद्धतीचा अवलंब केलेला असतो. यामध्ये युरोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि फिजिओथेरपीस्ट मिळून उपचार करीत असतात. लक्षणांना बघून औषधोपचार करण्यात येतात. मूत्रमार्गाच्या विकारांचे वेळेत निदान झाले, तर केवळ फिजिओथेरपीद्वारे पूर्ण उपचार शक्य आहे. गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतर काही निवडक व्यायाम तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात केलेत तर भविष्यात होणाऱ्या वरील समस्यांचा धोका टाळता येतो. सोबतच आहारावरील नियंत्रण, वजनाचे व्यवस्थापन देखील करणे क्रमप्राप्त आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *