World Diabetes Day दिवाळी बनवा ‘गोड’! मधुमेह कसा ठेवावा नियंत्रणात? जाणून घ्या

Spread the love

पूजा शिरभाते

दिवाळी म्हणून सगळीकडे धामधूम सुरू आहे. गोडाधोडाची रेलचेल आहे; पण आज दिवाळीसोबतच आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे जागतिक मधुमेह दिवस, १४ नोव्हेंबर. दिवाळीदरम्यान गोड खाण्यावर थोडे नियंत्रण ठेवले, तर मधुमेहींची दिवाळी निश्चितच ‘गोड’ होईल.

दिवाळी आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा व सर्वांत मोठा सण. दिव्यांची आरास करून, नवीन वस्तूंची खरेदी करून व खाण्या-पिण्याचे, फराळाचे अनेक पदार्थ बनवून दिवाळी साजरी करतो. सर्वाधिक चंगळ असते ती फराळाच्या पदार्थांची. चकल्या, चिवडा, शेव, अनारसे, करंज्या, लाडू, चिरोटे, शंकरपाळे असे अनेक पदार्थ जे आपण वर्षभरात फारसे कधी करत नाही, ते सारे दिवाळीत बनवतो. या शिवाय लक्ष्मीपूजन व भाऊबीजेला ताजे गोड पदार्थ असतातच. ‘थोडा मीठा हो जाये,’ म्हणत घरातील आबालवृद्ध या गोडावर ताव मारतात. त्यावेळी अनेकदा घरातील ज्येष्ठांना विसर पडतो, की आपल्याला मधुमेह आहे. औषध, गोळ्या तर नीट घेतोच आहे अशा अनेक सबबी सांगून अनेक जण दिवाळीदरम्यान पथ्ये मोडतात, त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढण्याचा धोका संभवतो. नेहमीच पथ्य पाळतो; परंतु काही दिवस ती मोडली तरीही त्रास होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
(सणासुदीच्या दिवसांत आहार कसा असावा? जाणून घ्या सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरकडून माहिती)
खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये विविधता या दिवाळीच्या दिवसात येणारच; परंतु प्रमाण योग्य असेल याची काळजी निश्चितच घेतली पाहिजे. आपणा सर्वांसाठी दिवाळीइतका आनंदाचा आणि मोठा सण असतो, की प्रत्येकाला साजरा करायचा असतो. थोड्या-बहुत प्रमाणात खाण्यापिण्याची मजा करायची असते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी दिवाळीदरम्यान काही काळजी घेतली, तर ते नक्कीच दिवाळीचा पुरेपुर आनंद लुटू शकतात.

ज्या लोकांना आताच मधुमेह झाला असेल म्हणजे सर्व नवीन मधुमेहींनी आपल्या आहारतज्ज्ञांकडून व डॉक्टरांकडून या आजाराविषयी नीट माहिती घ्यावी. तुम्हाला दिलेले औषध व आहाराची पथ्य यांची नीट माहिती असेल, तर मधुमेह नियंत्रण ठेवणे खूप सोपे आहे. अनेक जणांना वाटते फक्त भात, बटाटा व साखर बंद केले, की झाले; पण तसे नाही. इतरही अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्यात कर्बोदके मोठ्या प्रमाणात आहेत. ते सर्वही मधुमेही रुग्णांसाठी योग्य नाही. कुठल्या खाद्यपदार्थांमध्ये कर्बोदके जास्त आहेत, ती कशी टाळावीत, आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण कसे वाढवावे व योग्य प्रमाणात प्रोटिनचा समावेश कसा करता येईल ही सर्व माहिती व्यवस्थित करून घेतली पाहिजे.

(मधुमेहींनी दिवाळीत आहाराचं कसं करावं नियोजन? जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली माहिती)
दिवाळी असली, तरी तुमच्या वेळेतच डॉक्टरांनी ठरवून दिलेला औषधाचा डोस घ्या. दिवाळीच्या आधी व नंतर रक्त तपासणी करा. त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास औषधांचे डोस ठरवून, आहाराच्या पथ्यांबाबत योग्य माहिती घेऊन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येईल. नियमितपणे किमान अर्धा ते एक तास व्यायाम केला पाहिजे. सणांदरम्यान काही प्रमाणात आपले पथ्यसोडून खाणे-पिणे होणार आहे. तेव्हा व्यायाम निश्चितच खूप अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिवाळीतही रोज व्यायामासाठी वेळ काढा. पायी फिरायला जाणे, सायकलिंग किंवा योगासने, प्राणायाम तुम्ही करू शकता. शारीरिक फिटनेसनुसार कुठलाही व्यायाम रोज करायलाच हवा. यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास भरपूर मदत होईल.
(रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन का करावे? आरोग्यदायी लाभ माहीत आहेत का, जाणून घ्या)

फराळाच्या पदार्थांपैकी गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवा. अनारसे, करंज्या, लाडू इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात न खाल्लेलेच चांगले. फराळाचे गोड पदार्थ बनवताना जिथे शक्य असेल तिथे ‘आर्टिफिशल स्वीटनर’चा वापर करावा. मधुमेह झाल्यावर रोज चहा, कॉफी, किंवा दुधामध्ये ‘आर्टिफिशल स्वीटनर’ वापरायची सवय लावू नये; परंतु या मोठ्या सणांसाठी गोड पदार्थ बनवताना काही प्रमाणात ‘आर्टिफिशल स्वीटनर’ची मदत येऊ शकतो.

फराळाच्या पदार्थांव्यतिरिक्त दिवसातील दोन मुख्य जेवण, म्हणजे दुपारचे व रात्रीचे हे संपूर्ण संतुलित आहाराप्रमाणे असावे. या जेवणात प्रामुख्याने पालेभाजीचा वापर करावा, जेणेकरून आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण योग्य राहील. कच्चे सॅलड, पालेभाज्या, भाज्यांचे सूप असे वेगवेगळे पदार्थ जेवणात असावेत. आहारात प्रोटिन्सचे प्रमाण योग्य असावे. त्यानेही मधुमेह नियंत्रणात मदत मिळते.

दिवाळीतील फराळाच्या गोड पदार्थांवर तर नियंत्रण हवेच; परंतु मैद्याचे व बेसनाचे तळलेले इतर पदार्थही जसे शेव, चकल्या, खारे शंकरपाळी हेही कमी प्रमाणात घेतले पाहिजेत. या सर्व पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात तेल किंवा तूप असते. तेही मधुमेही रुग्णांसाठी चांगले नाही. या पदार्थांमुळे लठ्ठपणा किंवा हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. दिवाळीत योग्य आहाराची, व्यायामाची व औषधांची नीट काळजी घेतली, तसेच आरामाच्या वेळाही नीट ठेवल्या, तर दिवाळीचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल आणि मधुमेहही नियंत्रित ठेवता येईल.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *